मस्तच! आता पोलिसांना मिळणार इलेक्ट्रिक कार; TATA ची ‘ही’ EV ताफ्यात दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 05:22 PM2022-06-07T17:22:03+5:302022-06-07T17:22:49+5:30
पोलिसांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कारचा समावेश केला जात असून, तो भविष्यात आणखी वाढेल, असे सांगितले जात आहे.
कोलकाता: गेल्या अनेक महिन्यांपासून देशात इलेक्ट्रिक कारची डिमांड प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या सेगमेंटमध्ये आताच्या घडीला TATA मोटर्स आघाडीवर असून, टाटाच्या EV कार सुपरहीट ठरत आहे. इलेक्ट्रिक कारची विक्री वाढावी, यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वाहतुकीतील वाहने इलेक्ट्रिक पर्यायात देण्यास सुरुवात झाली आहे. शक्य तेथे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. आता अशातच आता पोलिसांच्या ताफ्यात EV कार दाखल होणार आहेत.
आता पोलीसही इलेक्ट्रिक वाहने वापरू लागले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक कारने पोलीस चोरांचा पाठलाग करताना किंवा एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करताना दिसणार आहेत. या बाबतीत कोलकाता पोलीस सर्वांत पुढे आहेत. कोलकाता पोलिसांनी अलीकडेच त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यात १७ टाटा नेक्सॉन ईव्ही कार्सचा समावेश केला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, १७ नवीन टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) कोलकाता पोलिसांच्या ताफ्यात सहभागी करून घेण्यात आल्या आहेत.
१७ नवीन गाड्या ताफ्यात समाविष्ट केल्या
कोलकाता पोलीस आधीपासूनच इलेक्ट्रिक वाहने वापरत आहेत. यावेळी त्यांनी १७ वाहने वाढवली आहेत. कोलकाता पोलिसांच्या ताफ्यातील Tata Nexon EVs ची एकूण संख्या आता २४३ इतकी झाली आहे. पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करार्यक्रमात त्यांनी या १७ नवीन गाड्या ताफ्यात सामावून घेतल्या. स्वच्छ पर्यावरणासाठी आपले थोडे योगदान देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी गस्तीच्या उद्देशाने या Tata Nexon EV कारचा ताफ्यात समावेश केला आहे.
दरम्यान, टाटा नेक्सॉन ईव्ही या कारमध्ये कंपनीने 30.2 kWh च्या क्षमतेची लिथियम आयन लिक्विड कूल्ड बॅटरी दिली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सिंगल चार्जमध्ये ३१० किमीहून जास्त ड्रायव्हिंग रेंज देते. ही कार १ तासात फास्ट चार्जिंग सिस्टमद्वारे ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. तर रेग्युलर चार्जरने ही बॅटरी चार्ज करण्यास ८ ते ९ तास वेळ लागतो.