Komaki DT 3000 Electric Scooter : सिंगल चार्जमध्ये जाणार 220kms; कोमाकीनं लाँच केली नवी इलेक्ट्रीक स्कूटर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 07:40 PM2022-03-27T19:40:00+5:302022-03-27T19:41:05+5:30
Komaki DT 3000 Electric Scooter : पाहा काय आहे विशेष आणि किती असेल किंमत.
Komaki DT 3000 Electric Scooter : इलेक्ट्रीक टू व्हीलर बनवणाऱ्या कोमाकीने शुक्रवारी नवीन इलेक्ट्रीक स्कूटर Komaki DT 3000 ची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही स्कूटर बाजारात आधीच अस्तित्वात असलेल्या इलेक्ट्रीक स्कूटरला टक्कर देणारी ठरेल. दिल्लीत या ई-स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1,15,000 रुपये इतकी निश्चित करण्यात आहे. शुक्रवारपासून ही स्कूटर सर्वच डीलरशीपमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
कोमाकीने या वर्षीचे आपले तिसरे उत्पादन (कॅलेंडर वर्ष) लाँच केले आहे. यापूर्वी कंपनीच्या रेंजर (Ranger) आणि व्हेनिस (Venice) सारख्या टू व्हीलरला चांगला प्रतिसाद मिळाला होता. इलेक्ट्रिक स्कूटर Komaki DT 3000 मध्ये 3000 वॅट BLDC मोटर देण्यात आली आहे. तसेच या स्कूटरमध्ये 62V52AH ची बॅटरी आहे. एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे DT 3000 सिंगल चार्जवर 180-220 किमी मायलेज देऊ शकते आणि या स्कूटरचा सर्वाधिक वेग 90 किमी प्रति तास इतका आहे.
फोटो जारी केला नाही
कंपनीने अद्याप या ई-स्कूटरचा फोटो जारी केलेला नाही. त्यामुळे, जर तुम्हाला या ई-स्कूटरमध्ये स्वारस्य असेल, तर तुम्ही डीलरशिपवर जाऊन या स्कूटरचा लूक आणि इतर फीचर्स पाहू शकता. “भारतीय ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर, आम्ही पुन्हा DT 3000 हाय-स्पीड स्कूटरच्या माध्यमातून लोकांची मने जिंकण्यासाठी तयार आहोत. DT 3000 ही 3000W BLDC मोटर आणि 62V52AH पेटंट लिथियम बॅटरीसह ऑफर करण्यात आली आहे. यामध्ये 12 हून अधिक मॉडर्न फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत," अशी माहिती कोमाकी इलेक्ट्रीक डिव्हिजनच्या डायरेक्टर गुंजन मल्होत्रा म्हणाल्या.