Mahindra Bolero Neo चा नवा अवतार येणार! ९ जण बसू शकणार; पाहा, किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 04:51 PM2022-06-09T16:51:55+5:302022-06-09T16:52:48+5:30
नवीन स्कॉर्पिओनंतर महिंद्रा आपल्या लोकप्रिय बेलोरो कारचे नवे फेसलिफ्ट लॉंच करणार आहे. पाहा, डिटेल्स...
नवी दिल्ली: आताच्या घडीला आघाडीची वाहन निर्माता असलेली महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी अनेक स्पर्धक कंपन्यांना तगडी टक्कर देत वाटचाल करत आहे. महिंद्रा कंपनीच्या अनेकविध कार प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यातील दोन प्रमुख कार म्हणजे स्कॉर्पिओ आणि बोलेरो. लवकरच महिंद्रा कंपनी नवीन स्कॉर्पिओ सादर करत असून, गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. यातच आता महिंद्रा कंपनी Mahindra Bolero Neo चा नवीन अवतार सादर करण्याच्या तयारी आहे.
Mahindra Bolero Neo या कारने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. टॉप सेलिंग कारच्या यादीत या बोलेरो कारचाही समावेश केला जातो. महिंद्रा कंपनी बोलेरो निओचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, ही कार या वर्षाच्या अखेरीस बाजारात लॉंच होऊ शकते. नवीन मॉडेलची खास गोष्ट म्हणजे ही कार ७ ऐवजी ९ सीटर मॉडेल असेल. कंपनीने जुलै २०२१ मध्ये पहिल्यांदा बोलेरो निओ कार लाँच केली होती.
नव्या मॉडेलला दिले नवे नाव
महिंद्रा कंपनी नवीन बोलेरोला नव्या नावाने सादर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. Mahindra Bolero Neo Plus असे या कारचे नवे नाव असू शकेल. नवीन बोलेरो निओ प्लस हे पूर्णपणे नवीन प्रोडक्ट नसेल. नवीन बोलेरो निओ प्लस ही कार जुन्या मॉडेलच्या तुलनेत थोडी मोठी असेल. नवीन कारमध्ये वेगळे इंजिन दिले जाणार नाही. सध्याच्या मॉडेलप्रमाणे यात २.२ लीटर डिझेल इंजिन मिळेल. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल.
नव्या कारची किती असेल किंमत?
आता भारतीय बाजारात असलेली Mahindra Bolero Neo ही कार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये N4, N8, N10R, N10 आणि N10 चा समावेश आहे.. आताच्या निओ मॉडेलच्या बेस व्हेरिएंटची किंमत ९.२९ लाख रुपये इतकी आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत ११.७८ लाख रुपये इतकी आहे. तर नवीन बोलेरो प्लसच्या बेस व्हेरिएंटची किंमत १२ लाख रुपयांच्या आसपास असू शकेल, असे सांगितले जात आहे.