पाणीच पाणी...! सनरुफ बंद असतानाही Mahindra Scorpio N मध्ये शिरलं पाणी, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:38 AM2023-02-28T10:38:45+5:302023-02-28T10:39:58+5:30
एका यूट्यूबरनं महिंद्रा स्कॉर्पियो एन (Mahindra Scorpio N) कारचा व्हिडिओ शेअर केला आहे.
नवी दिल्ली-
एका यूट्यूबरनं महिंद्रा स्कॉर्पियो एन (Mahindra Scorpio N) कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात कारच्या सनरुफमधून लिकेज होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सनरुफ पूर्णपणे बंद असतानाही कारच्या आत पाणी येत असल्याचं या व्हिडिओत दिसत असून या कारमधील मोठी गडबड उघडकीस आली आहे. त्यामुळे व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
स्कॉर्पियो-एन कार चालक एका धबधब्याखाली कार घेऊन जातो. यावेळी तो कारचं सनरुफ देखील बंद करतो. पण जशी कार धबधब्याखाली जाते तसं कारच्या आत सनरुफच्या आजूबाजूनं पाणी आत येताना दिसत आहे. अगदी धबधब्याची धार कारमध्ये लागते. मग कारच्या सनरुफ जवळच्या स्पीकरमधूनही पाणी आत येत असल्याचं दिसत आहे.
यूट्यूबर अरुण पवार यानं हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या चॅनलवर १५ लाखाहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. वेगवेगळ्या ब्रँड्सच्या कारचा रिव्ह्यू या चॅनलवरुन अरुण पवार करत असतो.
सनरुफ बंद असतानाही कारमध्ये पाणी येऊ लागल्यानं कारची सीट, गिअर बॉक्स, डॅशबोर्ड पाणीमय होऊन गेलं. पाण्याचा प्रवाह वाढू लागल्यानंतर कार चालक कार धबधब्याखालून पुढे घेऊन जातो. तसंच या अशा अनुभवामुळे यापुढे कधीच सनरुफवाली कार घेणार नाही असं यूट्यूबरनं म्हटलं आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.
एका यूझरनं सनरुफ कदाचित व्यवस्थित बंद झालेलं नसेल असं म्हटलं आहे. तर एकानं लिकेजची अडचण असू शकते असंही म्हटलंय. एका यूझरनं फक्त याच कारमध्ये तशी तक्रार असेल अशी भावना व्यक्त केली आहे. महिंद्रा कंपनीकडून अद्याप यावर कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.