Mahindra नं गुपचूप लॉन्च केली नवी Scorpio Classic s5! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 02:29 PM2023-05-29T14:29:56+5:302023-05-29T14:30:13+5:30
Mahindra Scorpio Classic S5 व्हेरिअंटदेखील डिलरशिपपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.
स्कॉर्पिओ हे महिंद्राचे अत्यंत यशस्वी ठरलेले उत्पादन आहे. गेल्या वर्षीच महिंद्राने नवी Scorpio-N लाँच केली. मात्र आपली सध्याची स्कॉर्पिओ बंद केली नाही. तर काही विशेष बदल करून नवी स्कॉर्पिओ लॉन्च केली. जिला Scorpio Classic असे नाव देण्यात आले. पण, Scorpio Classic केवळ S आणि S11 या दोनच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करण्यात आली होती. S हा बेस व्हेरिअंट, तर S11 हा टॉप व्हेरिअंट होता. मात्र आता महिंद्रा S5 व्हेरिअंट लॉन्च केरत आहे. जे या दोन्ही (S आणि S11) मधील असेल. Mahindra Scorpio Classic S5 व्हेरिअंटदेखील डिलरशिपपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.
महिंद्राने अद्याप आपल्या S5 व्हेरिअंटची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र या व्हेरिअंटची किंमत बेस व्हेरिअंट S (रु. 12.99 लाख, एक्स-शोरूम) आणि टॉप-स्पेक व्हेरिअंट S11 (रु. 16.81 लाख, एक्स-शोरूम) दरम्यान असेल. हे नवे S5 व्हेरिअंट त्याच्या बेस S व्हेरिअंटच्या जवळपास दिसते. कारण, यात खूप काही फीचर्स देण्यात आलेले नाहीत. बेस एस व्हेरिअंटच्या तुलनेत यात फार काही नाही. एस ट्रिममध्ये मिळणाऱ्या फीचर्सच्या तुलनेत यात केवळ 17 इंचांचे अलॉय व्हील्स, बॉडी कलर्ड बम्पर, बॉडी कलर्ड प्लास्टिक बॉडी क्लॅडिंग, रूफ रेल्स, स्कॉर्पिओ ब्रँडिंगसह डोअर क्लॅडिंग आणि साइड स्टेप आहे.
खरे तर, स्कॉर्पिओच्या या व्हेरिअंटमध्ये बॉडी कलर्ड डोर हँडल, इंफोटेनमेंट स्क्रीन, स्टिअरिंग-माउंटेड ऑडियो कंट्रोल, फॉग लॅम्प आणि इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएमदेखील देण्यात आले असते तर, अधिक छान झाले असते. मात्र, नव्या S5 ट्रिममध्ये हे सर्व देण्यात आलेले नाही. यात बेस व्हेरिअंटचे (एस) बरेच फीचर्स आहेत. जसे की, मॅन्युअल एसी, रिअर एसी व्हेंट्स, इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये एमआयडी, एलईडी टेल लाइट्स, तिसऱ्या रांगेत साइड फेसिंग बेंच सीट्स देण्यात आले आहेत.