Mahindra XUV400 : 6 सप्टेंबरला XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच होणार, Tata चे टेन्शन वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 01:07 PM2022-08-17T13:07:44+5:302022-08-17T13:49:46+5:30
Mahindra XUV400 : कंपनी पुढील महिन्यात XUV300 SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणणार आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, या कारला XUV400 असे नाव देण्यात आले आहे, जी 6 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येईल.
नवी दिल्ली : या वर्षी 15 ऑगस्टला महिंद्राने धमाकेदारपणे आपल्या पाच इलेक्ट्रिक SUV आणल्या आहेत. या कार भारतीय बाजारात लाँच केल्या जाणार आहेत. पाच नवीन इलेक्ट्रिक SUV मध्ये XUV.e8, XUV.e9, BE.05, BE.07 आणि BE.09 यांचा समावेश आहे, जे महिंद्राच्या नवीन हार्टकोअर डिझाइन फिलॉसफीसह येतील. यामधील पहिल्या चार इलेक्ट्रिक कार पुढील चार वर्षांत 2024 ते 2026 दरम्यान लाँच केली जातील. याशिवाय, कंपनी पुढील महिन्यात XUV300 SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणणार आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, या कारला XUV400 असे नाव देण्यात आले आहे, जी 6 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येईल.
गेल्या महिन्यात या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे काही फोटो लीक झाले होते. या कारचे डिझाईन 2020 ऑटो एक्स्पोमध्ये दाखवलेल्या eXUV300 कॉन्सेप्टसारखी आहे. मात्र, ही इलेक्ट्रिक कार पेट्रोल-डिझेल XUV300 पेक्षा थोडी लांब (जवळपास 4.2 मीटर) असेल. कारण इलेक्ट्रिक वाहनांना उप-4 मीटर कर नियम लागू होत नाही. लांबीव्यतिरिक्त, डीआरएलसह नवीन हेडलाइट्स, टेल-लॅम्पसाठी नवीन डिझाइन आणि रीप्रोफाइल केलेले टेलगेट यासारखे एलिमेंट याला फ्यूल XUV300 पासून वेगळे करतात.
मिळू शकतात ADAS फीचर
या इलेक्ट्रिक कारच्या मोटर किंवा बॅटरीबद्दल सध्या फारशी माहिती नाही. कंपनी याला सिंगल फ्रंट-व्हील-ड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटरसह आणू शकते, जी सुमारे 150hp पॉवर जनरेट करू शकते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, कंपनी XUV400 ला ADAS फीचर्ससह सुसज्ज करू शकते. या कारची थेट स्पर्धा Tata Nexon EV शी होऊ शकते, जी सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे.