मारुती कारच्या किंमती वाढणार...वर्ष समाप्ती, डिस्काऊंट हीच संधी साधा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:53 PM2018-12-06T12:53:46+5:302018-12-06T12:54:52+5:30
देशातील सर्वाधिक कारचा खप असलेली कंपनी मारुती सुझुकी नव्या वर्षात कारच्या किंमतींमध्ये वाढ करणार आहे.
मुंबई : देशातील सर्वाधिक कारचा खप असलेली कंपनी मारुती सुझुकी नव्या वर्षात कारच्या किंमतींमध्ये वाढ करणार आहे. यामुळे वर्षाच्या समाप्तीला मिळणारा डिस्काऊंट आणि कमी किंमत याचा फायदा घेण्याची हीच वेळ आहे. कारण नवीन वर्ष सुरु झाले तरीही पहिले 2 महिने जुन्या वर्षात उत्पादन झालेल्या कार उपलब्ध असतात. यामुळे नवीन वर्षात वाढीव किंमतीची कार घेण्यापेक्षा आताच कार घेतलेले फायद्याचे आहे.
मारुती सुझुकीला स्पेअर पार्ट आणि परदेशी चलनामध्ये आलेल्या दरवाढीचा परिणाम जाणवू लागला आहे. उत्पादनही मोठ्या प्रमाणावर असल्याने कंपनीच्या फायद्यावर याचा परिणाम होत आहे. यामुळे कंपनीने नव्या वर्षात जानेवारीपासून कारच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मारुतीसह इतरही कार कंपन्या बाजाराचा आढावा घेऊन वेळोवेळी किंमती वाढवत असतात. कारच्या किंमतीमध्ये वाढ करण्याबाबत मारुतीनेच जाहीर केले आहे. वाढलेला सर्वच खर्च कंपनी ग्राहकांवर लादणार नसून कंपनीही काही खर्च पेलणार आहे, असे कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
अद्याप कोणत्या वाहनावर कीती किंमत वाढविणार याचा निर्णय झाला नसून लवकरच यावर निर्णय होईल. मॉडेल्सच्या आधारावर या किंमती असणार असल्याचे समजते.