मारुतीने 'फाईव्ह स्टार' कार बनवून दाखवाव्यात; टाटा अल्ट्रॉझच्या लाँचिंगवेळी ओपन चॅलेंज
By हेमंत बावकर | Published: January 25, 2020 08:49 AM2020-01-25T08:49:43+5:302020-01-25T08:54:47+5:30
भारतात सुरक्षेपेक्षा कार किती देते याकडे पाहिले जाते. यामुळे कंपन्यांनी सुरक्षा न पाहता हलक्या वजनाच्या कार बाजारात आणायला सुरूवात केली.
- हेमंत बावकर
मुंबई : केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून नवीन सुरक्षा नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रवाशांची सुरक्षा महत्वाची मानण्यात आली आहे. टाटा मोटर्सने यावर दोन कार फाईव्ह स्टार ग्लोबल एनकॅप सुरक्षा रेटिंग मिळालेल्या बाजारात आणण्याच मान मिळविला आहे. मात्र, मारुती सुझुकीला हे काही जमलेले नाही. टाटाने नुकत्याच लाँच केलेल्या अल्ट्रॉझलाही फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. यावरून मारुतीला मोठे चॅलेंज देण्यात आले आहे.
भारतात सुरक्षेपेक्षा कार किती देते याकडे पाहिले जाते. यामुळे कंपन्यांनी सुरक्षा न पाहता हलक्या वजनाच्या कार बाजारात आणायला सुरूवात केली. यासाठी पातळ पत्रा, बॉडी कमी क्षमतेची, कमी गुणवत्तेचे फायबर अशा अनेक क्लुप्त्या वापरण्यात आल्या. यामुळे याचा थेट परिणाम प्रवाशांच्या सुरक्षेवर झाला आहे. एखादी कार समोरून येणाऱ्या वाहनाचाही आघात सहन करू शकत नाही. यामुळे काही अपघातांना कारमध्ये बसलेले अख्खेच्या अख्खे कुटुंबच ठार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
यामुळे सरकारने रस्ते अपघात आणि मृत्यू कमी करण्यासाठी दुचाकी आणि कार कंपन्यांना नियमावली लागू केली आहे. एबीएस, पॅसेंजर एअरबॅग, रिअर कॅमेरा अशा सुरक्षेच्या काही अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र, ग्लोबल एनकॅप ही संस्था जागतिक स्तरावर वाहनांची सुरक्षा तपासते. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे या वाहनांचे अपघात घडविले जातात. यामध्ये सेन्सर बसविलेले असतात. मानसांच्या जागी पुतळे असतात. त्यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहिले जाते. यासाठी ठराविक वेगही असतो. यामध्ये टाटा अव्वल ठरली आहे. मात्र, देशातील आघाडीची कंपनी मारुती यामध्ये सपशेल अपयशी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी महिंद्राची एक्सयुव्ही 300 हीनेही फाईव्ह स्टार रेटिंग मिळविले आहेत.
रश लेन या ऑटो पोर्टलने दिलेल्या महितीनुसार मारुतीची एकच कार सर्वाधिक सुरक्षा देणाऱ्या कारच्या यादीमध्ये आहे. ती म्हणजे ब्रिझा. ब्रिझाला फोर स्टार रेटिंग आहे. तर टाटाच्या पाच, महिंद्राच्या दोन, फोक्सवॅगन 1 आणि टोयोटा 1 अशा कार आहेत. सर्वाधिक सुरक्षित असल्याचा दावा करणारी फोर्डही यामध्ये दिसत नाही.
टाटा अल्ट्रॉझला लाँचिंगवेळी 5 स्टार रेटिंगचे सर्टिफिकीट देण्यात आले. यावेळी ग्लोबल एनकॅपचे कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डिव्हिड वार्ड यांनी थेट मारुतीच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या कंपन्यांनी टाटा आणि महिंद्राचा आदर्श घ्यावा आणि सुरक्षित कार बनवाव्यात असा सल्ला दिला. तसेच मारुतीसाठी हे चॅलेंज असेल, असेही ते म्हणाले. एकीकडे मारुतीला फटकारताना त्यांनी फोक्सवॅगन आणि टोयोटालाही कानपिचक्या दिल्या. या जागतिक दर्जाच्या कार कंपन्यांकडे फाईव्ह स्टार सुरक्षेच्या कार भारतीय बाजारात नसाव्यात याबद्दल खेद व्यक्त केला.