Maruti नं विकल्या सर्वाधिक कार, पण 'या' कंपनीसमोर सर्वांनीच मानली हार! Hyundai ला मागे टाकत आली नंबर- 2 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 10:07 AM2023-01-02T10:07:48+5:302023-01-02T10:10:41+5:30
दुसऱ्या क्रमांकाच्या बाबतीत मोठा बदल बघायला मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेली ह्युंदाई यावेळी तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे.
कंपन्यांसाठी वर्ष 2022 चे काही महिने जबरदस्त ठरले आहेत. या वर्षाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या कारच्या जबरदस्त विक्रीनंतर, ग्राहकांनी डिसेंबरमहिन्यातही वाहनांची जबरदस्त खरेदी केली आहे. या महिन्यातही मारुती सुझुकीच पहिल्या क्रमांकाची कार कंपनी ठरली. डिसेंबर महिन्यात मारुतीने 1,39,347 वाहनांची विक्री केली. मात्र, डिसेंबर 2021 च्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत 9.91 टक्क्यांची घट झाली आहे. असे असले तरी, विक्रीच्या बाबतीत मारुतीला कोणीही टक्कर देऊ शकत नाही. याच बरोबर, दुसऱ्या क्रमांकाच्या बाबतीत मोठा बदल बघायला मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेली ह्युंदाई यावेळी तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे.
या कंपनीने दाखवला दम -
वाहन विक्रीच्या बाबतीत डिसेंबर 2022 मध्ये टाटा मोटर्स दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या महिन्यात टाटा मोटर्सची देशांतर्गत विक्री एकूण 10 टक्क्यांनी वाढून 72,997 युनिट वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने 66,307 वाहनांची विक्री केली होती. याचबरोबर, गेल्या महिन्यात, निर्यातीसह इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री 3,868 युनिट्स होती, जी डिसेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 2,355 इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत 64.2 टक्क्यांनी अधिक आहे.
टाटा मोटर्स पॅसेन्जर व्हेइकल लिमिटेड आणि टाटा पॅसेन्जर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, ‘‘इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच वृद्धीचा वेगही कायम राहील अशी आम्हाला आशा आहे. तसेच, विविध राज्यांच्या प्रगतीशील धोरणांसंदर्भातील घोषणांमुळेही याला चालना मिळेल.
तिसऱ्या स्थानावर ह्युंदाई -
Hyundai Motor India Limited (HMIL) यावेळी दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. डिसेंबर महिन्यात कंपनीची विक्री 18.2 टक्क्यांनी वाढून 57,852 युनिटवर पोहोचली. डिसेंबर 2021 मध्ये कंपनीने 48,933 वाहने विकली होती. पण, 2022 या संपूर्ण वर्षाचा विचार करता, ह्युंदाई दुसऱ्या क्रमांकावर तर टाटा मोटर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये, Hyundai ने 5,52,511 युनिट्स एवढी आतापर्यंतची सर्वाधिक देशांतर्गत विक्री नोंदवली. तर टाटा मोटर्सने 5,26,798 वाहने विकली आहेत.