मारुती सुझुकीलाही मंदीचा विळखा; 1000 कर्मचाऱ्यांची कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 04:04 PM2019-08-05T16:04:43+5:302019-08-05T16:08:11+5:30

मारुती सुझुकीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तसेच नवीन भरतीवरही बंदी आणली आहे.

Maruti Suzuki also faces a recession; 1000 employees lost jobs | मारुती सुझुकीलाही मंदीचा विळखा; 1000 कर्मचाऱ्यांची कपात

मारुती सुझुकीलाही मंदीचा विळखा; 1000 कर्मचाऱ्यांची कपात

Next

नवी दिल्ली/मुंबई : गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रातील आर्थिक मंदीही उघड व्हायला सुरुवात झाली आहे. वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे गेल्या आठवड्यात टाटा मोटर्सने उत्पादन थांबविल्याने खळबळ माजलेली असताना आता भारताची सर्वात मोठी कंपनी मारुतीनेही 1000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे या मंदीचा विळखा वाढू लागल्याचे संकेत मिळत आहेत. 


मारुती सुझुकीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तसेच नवीन भरतीवरही बंदी आणली आहे. तसेच मंदीपासून वाचण्यासाठी कंपनी विविध उपाययोजना करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मारुतीसह अन्य वाहन कंपन्यांच्या विक्रीने ऐतिहासिक घसरण नोंदविली आहे. 


जेव्हा मंदी येते तेव्हा कंत्राटी कामगार यांना पहिला फटका बसतो. मात्र, कंपनीने या प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेले नाही. केवळ मारुतीलाच नाही तर अन्य ऑटो कंपन्यांनाही उत्पादन कमी करावे लागले आहे. यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कमी केले जात आहे. 

30 स्टील कंपन्यांना लागले टाळे; टाटा मोटर्सने उत्पादन थांबविले


दर महिन्याला विक्रीमध्ये वाढ पाहणाऱ्या मारुतीला यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच उतरता आलेख पहायला मिळाला आहे. जुलै महिन्यात मारुतीने गेल्या वर्षीच्या तुलनेत 35.1 टक्के घट नोंदविली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये कंपनीने 154,150 कार विकल्या होत्या. तर यंदा कंपनीने 100,006 कार विकल्या आहेत. एप्रिल ते जुलै दरम्यान कंपनीच्या 474,487 कार विकल्या गेल्या आहेत. याच कालावधीत मारुतीने गेल्या वर्षी  617,990 एवढ्या कार विकल्या होत्या. 

कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने, शोरुमही बंद होऊ लागले
मारुती सुझुकीने नेक्सा आणि अरिना या ब्रँडखाली कार विक्री दालने उघडली होती. मध्यम वर्गाला आकर्षित करण्याचा हा प्रयत्न होता. बलेनो, इग्निस, सियाझ, एस क्रॉस अशा कार या दालनांमधून कंपनी विकत होती. मात्र, विक्री घटल्याने डीलरना ही दालने बंद करावी लागली आहेत. तुर्भेतील नेक्साचा शोरूम याच कारणामुळे बंद करण्यात आला आहे. तर मारुतीने सेकंड हँड कारच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले होते. ट्रू व्हॅल्यू या नावे त्यांनी वापरलेल्या कारची विक्री सुरु केली होती. मात्र, नवीन कारसोबत जुन्या कारची विक्रीही मंदावल्याने कर्मचाऱ्यांचे पगार काढणेही कंपनीला अवघड बनले होते. या कर्मचाऱ्यांचे पगार 20 दिवस उशिराने केले जात आहेत. 
 

Web Title: Maruti Suzuki also faces a recession; 1000 employees lost jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.