Maruti Car Sale: मारुतीचे असेही दिवस आले! 42 हजारांचा डिस्काऊंट, तरी एकही एस क्रॉस कार विकली गेली नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 02:06 PM2022-08-28T14:06:01+5:302022-08-28T14:22:06+5:30
लाथ मारेन तिथून पाणी काढेन, अशा अविर्भावात गेल्या अनेक वर्षांपासून मारुती राज्य करतेय. पण मारुतीची एक कार अशी आहे जिला गेल्या काही महिन्यांपासून गिऱ्हाईकच नाहीय.
देशातच नाही विदेशातही पाण्यासारख्या कार विकणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीवर मोठी नामुष्कीची वेळ आली आहे. लाथ मारेन तिथून पाणी काढेन, अशा अविर्भावात गेल्या अनेक वर्षांपासून मारुती राज्य करतेय. पण मारुतीची एक कार अशी आहे जिला गेल्या काही महिन्यांपासून गिऱ्हाईकच नाहीय.
मारुतीची सर्वात महागडी आणि प्रमिअम कार एस क्रॉसला आता गिऱ्हाईकच राहिलेले नाहीय. कंपनीने एप्रिलमध्ये 2,922 युनिट्सची विक्री केली होती. मार्चमध्ये 2,674 एस क्रॉस विकल्या होत्या. मात्र, त्यानंतर मारुतीच्या या कारची विक्री खालावली. मे महिन्यात 1,428 कार विकल्या गेल्या. जूनमध्ये तर 697 एवढ्याच कार विकल्या गेल्या. यानंतर जुलैमध्ये जो आकडा समोर आला, त्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
जुलैमध्ये एकही एस क्रॉस विकली गेली नाही. या कारवर कंपनी ४२ हजार रुपयांची सूट देत आहे. याला मारुतीचीच एक कार कारणीभूत आहे. कारण ग्रँड विटारा येत आहे. असे असताना जुन्या कारकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाहीय. ही नवी कार एस क्रॉसची जागा घेईल, परंतू मारुतीने अद्याप जुनी कार वेबसाईटवरून काढलेली नाहीय.
मारुती सुझुकीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एस-क्रॉसला नव्या ढंगात बाजारात आणले होते. यामध्ये कंपनीने XL6 सारखी फ्रंट ग्रिल दिली होती. हेडलॅम्पमध्ये मल्टिपल एलईडी लॅम्प आणि इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट देण्यात आले आहेत. यात 1.4-लिटर DITC इंजिन आहे, जे माईल्ड हाय़ब्रिड आहे. तरी देखील ही कार आता विकली जात नाहीय. एस-क्रॉस ही Nexa डीलरशिपद्वारे विकली जाणारी पहिली कार आहे. सध्या, कंपनी S-Cross व्यतिरिक्त Nexa द्वारे Ignis, Baleno, Ciaz आणि XL6 देखील विकते.