मारुती लाँच करणार इलेक्ट्रीक वॅगन आर; पण तुम्ही खरेदी करू शकणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 01:24 PM2019-08-16T13:24:42+5:302019-08-16T13:25:39+5:30
भारतात नुकतेच पदार्पण करणारी आणि कमी काळात भरपूर बुकिंग मिळविणारी ब्रिटीश कंपनी एमजी मोटर्सनेही इव्ही वाहन आणण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाने टिगॉरचे ईव्ही मॉडेल लाँच केले आहे.
भारतात केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वाहन निर्मात्या कंपन्यांनी नाखुशीने का होईना इलेक्ट्रीक वाहने उतरविण्यास सुरूवात केली आहे. महिंद्रा, टाटानंतर आणखी एक भारतीय कंपनी मारुतीने त्यांची लोकप्रिय कार वॅगन आर ईव्ही लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही कार कंपनी नाखुशीनेच लाँच करत असल्याचे दिसत आहे.
भारतात नुकतेच पदार्पण करणारी आणि कमी काळात भरपूर बुकिंग मिळविणारी ब्रिटीश कंपनी एमजी मोटर्सनेही इव्ही वाहन आणण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाने टिगॉरचे ईव्ही मॉडेल लाँच केले आहे. सध्या ही कार सरकारी कार्यालये, खासगी टूर्सपुरतीच मर्यादीत आहे. लवकरच ही कार सामान्यांसाठी लाँच केली जाणार आहे. मात्र, या ईव्ही कारसमोर मोठी आव्हाने आहेत.
मारुती सुझुकी वॅगनआर ही कार लाँच करणार आहे. या कारची देशभरात टेस्टिंग सुरू आहे. मात्र, ही कार सामान्य ग्राहक खरेदी करू शकणार नाही. कारण या कारची किंमत 10 लाखांच्या वर असणार आहे. या कारची बॅटरी महागडी असल्याने इलेक्ट्रीक वाहनेच महाग असणार आहेत. ह्युंदाईने नुकतीच लाँच केलेली कोना ही कार तब्बल 25 लाखांच्या वरच मिळते. यामुळे इलेक्ट्रीक कार परवडणाऱ्या किंमतीत नसल्याने ग्राहकांचा ओढा पेट्रोल, सीएनजी कारवरच अधिक आहे. सध्या विशिष्ट वर्गच या इलेक्ट्रीक कारकडे वळत असून त्यांच्याकडे बॅटरी बदलण्याची आणि एवढी महागडी कार घेण्याची ताकद आहे, असा हा वर्ग आहे.
इलेक्ट्रीक वाहनाची एका चार्जिंगमध्ये जाण्याची रेंज खूप कमी आहे. ह्युंदाईच्या कोनाची रेंज 452 किमीच्या आसपास असल्याचा कंपनीने दावा केलेला आहे. मात्र, ट्रॅफिक, खड्डे, संथगतीची वाहतूक आदी गोष्टींचा विचार केल्यास ही रेंज खूपच कमी होणार आहे. टाटा, महिंद्राच्या कारना फारतर 100 चा आकडा गाठता आला आहे. यामुळे या कार केवळ सरकारी कार्यालये, ओला, उबर सारख्या कंपन्या खरेदी करत आहेत.
शहरांतही परिस्थिती बिकट
देशभरातच नाही तर शहरांमध्येही चार्जिंग स्टेशनची वानवा आहे. घरी चार्ज करायचे असल्यास कमीतकमी टू फेज वीज कनेक्शन लागेल. तसेच स्वत:ची पार्किंग स्पेसही लागेल. उत्तुंग इमारत असल्यास किंवा 4 ते 5 मजल्याची इमारतही असल्यास कार तळमजल्यावर पार्क केली जाते. यामुळे कारपर्यंत वीज कनेक्शन नेणे हे देखील अवघड ठरणार आहे. कॉमन पार्किंग असल्यास प्रत्येकवेळी कार कुठे चार्ज करायची असाही प्रश्न ग्राहकांना सतावत आहे. कारची रेंजही कमी असल्याने इच्छित स्थळी जाणे दिव्यच ठरणार आहे. एका चार्जिंगसाठी दीडे ते दोन तास थांबावे लागण्याची शक्यता आहे. शिवाय वेटींग पिरिएड असेल तो वेगळाच वेळ यामुळे 400 ते 500 किमी जाण्यासाठी प्रवासाचा वेळ आणि चार्जिंगचा असा दुप्पट वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे वाहन कंपन्याही संकटात आल्या आहेत.