मारुती सुझुकीला ग्राहक न्यायालयाचा दणका; 50 हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 04:33 PM2018-08-28T16:33:16+5:302018-08-28T16:36:37+5:30
जुलै 2012 ला राजकोट चे जामनगरदरम्यान हायवेवर अचानक बिघडली. यानंतर ही कार मारुतीच्या गॅरेजमध्ये नेण्यात आली. या काळापासून आजपर्यंत ग्राहकाने ही कार वापरलेली नाही.
अहमदाबाद : देशातील वाहनप्रेमींच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या मारुती सुझुकीला एका ग्राहकाला सारखी नादुरुस्त होणारी कार विकल्याबद्दल ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. ग्राहकाला झालेल्या त्रासाबद्दल 50 हजार रुपये आणि खराब सुटे भाग बदलून देण्याचे आदेश दिले आहेत.
मारुती सुझुकीवर भारतीय ग्राहक डोळेझाकून विश्वास ठेवतात. मात्र, ग्राहकांना फसविण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार गुजरातमधील पोरबंदर येथील एका ग्राहकाबाबत घडला आहे. नलीनीभाई कनानी यांनी मार्च 2011 मध्ये मारुतीची स्विफ्ट ही कार घेतली होती. मात्र, कनानी यांची कार दुरुस्त करताना ती वॉरंटीमध्ये होती. मात्र, कंपनीने त्यांना वॉरंटी न देता दुरुस्तीचे पैसे उकळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ही कार केवळ 17 हजार किमी चालली होती.
या विरोधात कनानी यांनी ग्राहक तक्रार निवारण मंच, पोरबंदर येथे धाव घेतली होती. मंचाने कंपनीला त्यांना कार बदलून देणे किंवा कारची किंमत 5.41 लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले होते. तसेच मानसिक त्रासापोटी कनानी यांना 3 हजार रुपयेही देण्यास बजावले होते.
याविरोधात मारुतीने गुजरात राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये धाव घेतली होती. तसेच चालकाने बेदरकारपणे कार चालविल्याने अपघात झाला होता. यामुळे कारला नुकसान पोहोचले होते, असा दावा कंपनीने केला होता. मात्र, ग्राहक आयोगाकडे मारुती सुझुकी या अपघातामुळे कारला खालच्या बाजुला नुकसान पोहोचल्याचा दावा सिद्ध करू शकली नाही.
यामुळे आयोगाने मारुती सुझुकीला पोरबंदर ग्राहक मंचाच्या निर्णयातून काही प्रमाणात दिलासा देत कार मोफत दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 15 सप्टेंबरपर्यंत ही कार ग्राहकाला परत करण्याबरोबरच 50 हजार रुपये दंड ठोठावला आहे.