Maruti Suzuki Recall: अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा, गाड्या वापरू नका! मारुतीचा हजारो कारमालकांना तातडीचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:37 AM2023-01-18T11:37:54+5:302023-01-18T11:38:23+5:30
कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये याची माहिती दिली गेली आहे. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे.
भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने बुधवारी अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारापर्यंत हजारो कार एका मोठ्या समस्येमुळे माघारी बोलावल्या आहेत. कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये याची माहिती दिली गेली आहे. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे.
कार रिकॉल करून ही समस्या दुरुस्त केली जाणार आहे. या कार ८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ या काळात उत्पादित करण्यात आल्या होत्या. Alto K10, S-Presso, Eeco, Brezza, Baleno आणि Grand Vitara ची जवळपास 17,362 यूनिट्स रिकॉल करण्यात आली आहेत.
रिकॉल केल्या गेलेल्या कार मारुतीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये तपासल्या जाणार आहेत. गरज भासल्यास सदोष एअरबॅग कंट्रोलर बदलला जाईल. या समस्येमुळे अपघात झाल्यास एअरबॅग आणि सीट बेल्ट प्रीटेन्शनर त्यांचे काम करण्यात अपयशी ठरण्याची शक्यता आहे.
या सदोष सिस्टिम असलेल्या कारमधील दुरुस्ती होईपर्यंत ग्राहकांनी त्यांच्या कार चालवू नयेत किंवा त्यांचा वापर करू नये असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे. प्रभावित वाहन मालकांना तातडीने मारुती सुझुकी डीलरशिपकडून कळविले जाणार आहे.
मारुती सुझुकी इंडियाने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती सुमारे 1.1 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. एप्रिल 2022 नंतर चालू आर्थिक वर्षात ही दुसरी वेळ आहे.