Maruti Suzuki Swift S-CNG: मारुतीची स्विफ्ट सीएनजी कार लाँच; जबराट मायलेज, किंमत... जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 10:44 AM2022-08-15T10:44:52+5:302022-08-15T10:45:22+5:30
स्विफ्ट एस-सीएनजी ही मारुतीची नववी सीएनजी कार आहे. स्विफ्ट व्यतिरिक्त, मारुती सुझुकी अल्टो, वॅगनआर, सेलेरियो, डिझायर, एर्टिगा, ईको, सुपर कॅरी आणि एस-सीएनजी तंत्रज्ञानासह टूर-एस मिळते.
देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने भारतीय बाजारात लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचे सीएनजी (Swift CNG) मॉडेल आणले आहे. नुकतीच ही कार लाँच करण्यात आली. स्विफ्टची दोन व्हेरिअंट VXi आणि ZXi मध्ये सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. जाणून घ्या किंमत...
स्विफ्टच्या सीएनजी मॉडेल Swift VXi S-CNG ची किंमत 7.77 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. तर ZXi ची किंमत 8.45 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. Swift S-CNG मध्ये 1.2-लीटर, 4-सिलेंडर, नॅचरली एस्पिरेटेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 89 PS ची ताकद आणि 4,400 rpm वर 113 Nm पीक टॉर्क तयार करते. सीएनजीवर सुरु असेल तेव्हा 77 PS ताकद आणि 98 Nm टॉर्क दिला जातो.
मायलेज...
मारुतीची स्विफ्ट सीएनजी कार मायलेजमध्ये देखील चांगली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार कार 30.90 किमी प्रति किलोग्राम मायलेज देते. स्विफ्ट एस-सीएनजी ही मारुतीची नववी सीएनजी कार आहे. स्विफ्ट व्यतिरिक्त, मारुती सुझुकी अल्टो, वॅगनआर, सेलेरियो, डिझायर, एर्टिगा, ईको, सुपर कॅरी आणि एस-सीएनजी तंत्रज्ञानासह टूर-एस मिळते.
मारुती सुझुकीची S-CNG वाहने ड्युअल इंटरडिपेंडंट इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (ECUs) आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टमसह येतात. ECU आणि इंजेक्शन प्रणालीचे काम पुरेसे हवा आणि इंधन मिश्रण पुरवठा करणे हे आहे. गंज टाळण्यासाठी, मारुती सुझुकी स्टेनलेस स्टील पाईप्स वापरत आहे. तसेच शॉर्ट सर्किटची शक्यता दूर करण्यासाठी वायरिंग हार्नेस टेक्निक वापरले आहे. याव्यतिरिक्त, एक मायक्रोस्विच देण्यात आला आहे, जो सीएनजी भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान इंजिनला सुरू होऊ देत नाही.