Alto नाही, तर 'ही' ठरली मारुतीची सर्वाधिक विक्री झालेली कार
By जयदीप दाभोळकर | Published: January 8, 2021 11:18 AM2021-01-08T11:18:56+5:302021-01-08T11:25:28+5:30
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा ऑटो क्षेत्राला बसला होता फटका
भारतात मारुती सुझुकीच्या गाड्या अनेकांची पहिली पसंती असते. मारुती सुझुकीची स्विफ्ट ही कार २०२० या वर्षात सर्वाधिक विक्री झालेली गाडी ठरली आहे. या गाडीनं मारुतीच्याच ऑल्टो या कारचा विक्रम मोडला आहे. गेल्या १५ वर्षांत हा विक्रम स्विफ्टच्याच सेडान मॉडेल डिझायरनं २०१८ मध्ये केला होता. परंतु २०२० मध्ये यात डिझेल मॉडेलचा पर्याय उपलब्ध नसल्यानं सर्वाधिक फटका हा डिझायरच्या विक्रीला बसल्याचं म्हटलं जात आहे.
२०२० या वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख १० गाड्यांच्या वार्षिक विक्रीवर मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामध्ये केवळ किया मोटर्सची सेल्टोस ही अपवाद ठरली. ही कार ऑगस्ट २०१९ मध्येच भारतीय बाजारात दाखल झाली होती. गेल्या वर्षात ऑल्टोच्या विक्रीत २६ टक्क्यांची घट झाली असून या कालावधीत १ लाख ५४ हजार ०७४ गाड्यांची विक्री करण्यात आली. तर दुसरीकडे डिझायर आणि ब्रेझा या गाड्यांच्या विक्री अनुक्रमे ३७ आणि ३४ टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. याच्या तुलनेत स्विफ्ट आणि बलोनोच्या विक्रीत जवळपास १६.२ टक्क्यांची घट झाल्याचं समोर आलं आहे.
यामुळेच प्रमुख १० गाड्यांमध्ये स्विफ्ट ही पहिल्या क्रमांकावर, ऑल्टो दुसऱ्या आणि बलोनो तिसऱ्या क्रमांकावर राहिली. एक्स-प्रेसोच्या स्पर्धेचा फटकाही ऑल्टोच्या विक्रीला बसल्याचं म्हटलं जात आहे. २०२० मध्ये एक्स-प्रेसोच्या ६७ हजार ६९० गाड्यांची विक्री झाली.
क्रेटा सर्वाधिक विक्री झालेली एसयूव्ही
मारुती सुझुकीची स्पर्धक कंपनी ह्युंदाईची क्रेटा ही सर्वाधिक विक्री झालेली एसयूव्ही कार ठरली आहे. या कालावधीत तब्बल ९७ हजार ह्युंदाई क्रेटाची विक्री झाली. तर टॉप १० गाड्यांच्या यादीत ही गाडी सातव्या स्थानावर होती. तर नव्यानं भारतीय बाजारपेठेत उतरलेल्या किया मोटर्सची सेल्टोस ही आठव्या क्रमांचा सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे.
डिझायरनंतर ह्युंदाई एलीट आय २० कारच्या विक्रीलाही मोठा फटका बसला. मारुतीनं यापूर्वी डिझेल कार्सची विक्री न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा परिणाम डिझायरसोबतच ब्रेझाच्या विक्रीवर झाला. २०२० मध्ये ही कार प्रमुख १० गाड्यांच्या यादीत १० व्या स्थानावर राहिली.