मारुतीची स्विफ्ट फेल झाली...पाहा किती आहे सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 11:28 AM2018-10-09T11:28:14+5:302018-10-09T11:33:27+5:30
मारुतीच्या विटारा ब्रिझा आणि टाटाच्या नेक्सॉनने आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमावलीमध्ये 4 स्टार मिळविले.
मारुतीच्या विटारा ब्रिझा आणि टाटाच्या नेक्सॉनने आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमावलीमध्ये 4 स्टार मिळविले असताना मारुतीची नुकतीच लाँच झालेली स्विफ्टने घोर निराशा केली आहे. या चाचणीमध्ये भारतीय बनावटीच्या नव्या स्विफ्टला पाचपैकी केवळ 2 स्टार मिळाल्याने भारतीय वाहनचालकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मारुती सुझुकीवर भारतीयांचा मोठा विश्वास आहे. मारुतीच्या कार या परवडणाऱ्या असल्याने भारतीय ग्राहकाच्या मनात या कंपनीने गारुड केले आहे. मात्र, कंपनी या ग्राहकांच्या जिवाशी खेळत असल्याचे यावरून दिसत आहे. मध्यमवर्गाला परवडणाऱ्या अशा स्विफ्ट कारचे तिसरे रुप मारुतीने पाच महिन्यांपूर्वीच भारतात लाँच केले होते. यामध्ये एबीएस, इबीडी, एअरबॅग अशा सुरक्षेच्या प्रणालीही देण्यात आल्याचा दावा कंपनीने केला होता. मात्र, एवढे असूनही ही कार सुरक्षेची मानांकने मिळविण्यात अपयशी ठरली आहे.
भारतातील ग्राहकांची मानसिकता सुरक्षेऐवजी मायलेज, मेन्टेनन्समध्ये चार पैसे कसे वाचतील याकडे आहे. यामुळे मारुतीने जुन्या स्विफ्टच्या तुलनेत 100 किलोंनी वजन घटविले होते. यामध्ये कारच्या पत्र्याचा दर्जाही खालावला आहे.
भारतात विकल्या जाणाऱ्या स्विफ्टला युरो एनकॅपमध्ये केवळ 2 स्टार मिळाले, तर परदेशात विकल्या जाणाऱ्या स्विफ्टला 3 स्टार मिळाले आहेत. ग्लोबल एनकॅपने सरळ शब्दांत ही कार अस्थिर असल्याचे म्हटले आहे.
युरोपमध्ये विकल्या जाणाऱ्या कारमध्ये भारतीय कारपेक्षा जास्त सुरक्षा प्रणाली बसविलेल्या असतात. भारतीय मॉडेलमध्ये साईड बॉडी आणि कर्टन एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारख्या प्रणालींची कमी असते. युरोपमध्ये हे फिचर स्टँडर्ड असले तरीही भारतात ते पर्यातही उपलब्ध नाहीत.