MG ने ग्राहकांना दिला मोठा झटका, 'या' गाड्यांच्या वाढवल्या किमती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 11:11 AM2022-09-21T11:11:58+5:302022-09-21T11:12:41+5:30
MG Cars : गेल्या काही दिवसांपूर्वी एमजीने एस्टर एसयूव्हीच्या (Aster SUV) किमतीतही वाढ केली होती.
नवी दिल्ली : सणासुदीच्या आधीच एमजीने (MG)आपल्या काही मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही हेक्टर (Hector) आणि हेक्टर प्लसच्या (Hector Plus) किमती वाढवल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एमजीने एस्टर एसयूव्हीच्या (Aster SUV) किमतीतही वाढ केली होती.
सध्या एमजीने हेक्टर आणि हेक्टर प्लसच्या किमती कमाल 28,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत, तर आधी एस्टरची किंमत 10,000 रुपयांनी वाढवली होती. ज्यामध्ये एमजी एस्टरची किंमत 10.32 लाख रुपये (बेस व्हेरिएंट) वरून 18.23 लाख रुपयांपर्यंत (टॉप स्पेक व्हेरिएंट) झाली आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.
सध्या कंपनीने हेक्टर एसयूव्हीच्या किंमती व्हेरिएंटनुसार 25,000 ते 28,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. त्याच वेळी, आपल्या ड्युअल टोन अलॉय व्हील असलेल्या मॉडेलला 10,000 रुपये अधिक द्यावे लागतील. दरम्यान, एमजी हेक्टरचे फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच लाँच होणार आहे. एमजी मोटर इंडियाने नवीन हेक्टरचे अनेक टीझर आधीच रिलीज केले आहेत. सणासुदीच्या काळात म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
एसयूव्हीला नेक्स्ट-जेन i-Smart टेक्नॉलॉजीसह 14-इंचाचा मोठा पोर्ट्रेट एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल, जो वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल. यात ड्युअल-टोन इंटीरियर थीम आणि 7-इंचाचा पूर्णपणे डिजिटल कॉन्फिगरेबल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल. पण, हे फेसलिफ्ट लाँच होण्यापूर्वीच कंपनीने सध्याच्या हेक्टरच्या किमती वाढवल्या आहेत.
एमजी हेक्टर आणि हेक्टर प्लस एसयूव्ही दोन इंजिन ऑप्शनसह येतात. यामध्ये 1.5-लिटर पेट्रोल युनिट समाविष्ट आहे, जो 141 Bhp आणि 250 Nm जनरेट करतो. हे 6-स्पीड मॅन्युअल, CVT किंवा 7-स्पीड DCT सह उपलब्ध आहे. तसेच, दुसरा इंजिन ऑप्शन 2.0-लिटर डिझेल आहे, जो 168 Bhp आणि 350 Nm जनरेट करतो. हे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.