MG Motors लाँच करणार ALTO पेक्षाही छोटी इलेक्ट्रिक कार! जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 08:50 AM2022-09-07T08:50:37+5:302022-09-07T09:43:46+5:30
MG Motors : एमजी मोटर्सची छोटी कार इलेक्ट्रिक कन्व्हर्टेबल असणार आहे. या कारची सध्या चाचणी सुरू असून कंपनी पुढील सहा महिन्यांत लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवी दिल्ली : ब्रिटिश कंपनी एमजी मोटर्स (MG Motors) भारतीय ऑटो मार्केटमध्ये (Indian Auto Market) मोठा धमाका करणार आहे. कंपनी अल्टोपेक्षाही छोटी कार लाँच करण्याच्या योजनेवर काम करत आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी या सेगमेंटमध्ये आपला पोर्टफोलिओ मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. एमजी मोटर्सची छोटी कार इलेक्ट्रिक कन्व्हर्टेबल असणार आहे. या कारची सध्या चाचणी सुरू असून कंपनी पुढील सहा महिन्यांत लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रिपोर्टनुसार, एमजी मोटर्सची ही इलेक्ट्रिक कार इंडोनेशियामध्ये यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Wuling Air EV वर आधारित असणार आहे. कंपनी आपल्या छोट्या इलेक्ट्रिक कारमध्ये भारतीय परिस्थितीनुसार बदल करू शकते. कंपनीने जाहीर केले आहे की, चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात येईल.
कंपनी आपल्या एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कारची बॅटरी भारतीय कंडीशननुसार तयार करत आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची लांबी. या कारची लांबी 2.9 मीटर असेल असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ही कार भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मारुती अल्टोपेक्षा लहान असणार आहे. अल्टोची लांबी 3.45 मीटर आहे. एमजी मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलपासून वायरलेस कनेक्टिव्हिटी सारखी फीचर्स असतील.
इतकी असू शकते किंमत
एमजी मोटर्स इलेक्ट्रिक कारला 2010 mm चा व्हीलबेस मिळेल. कंपनी या कारमध्ये अलॉय व्हील्स देऊ शकते. या कारमध्ये 20kWh ते 25kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळू शकतो. तसेच, रिपोर्टनुसार ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 150 किमीपर्यंत प्रवास करू शकते. भारतीय ऑटो मार्केटमध्ये या इलेक्ट्रिक कारची किंमत 10 ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऑटो एक्सपो कार दिसण्याची शक्यता
एमजी मोटर्स भारतीय बाजारपेठेसाठी परवडणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांवर सतत काम करत आहे. एमजी मोटर्सने आगामी इलेक्ट्रिक कारला E230 असे कोडनेम दिले आहे. कंपनी आपली एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करू शकते. या कारच्या पुढील बाजूस पूर्ण लांबीचा लाइट बार दिसणार आहे. स्लिम फॉग लॅम्प बंपरमध्ये मिळेल. या इलेक्ट्रिक कारचे चार्जिंग पॉट समोरच्या बाजूला मिळणार आहे.