Nexon-Brezza ची सुट्टी करेल Toyota! येतेय 'मिनी फॉर्च्यूनर', असे असतील फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 05:35 PM2023-04-22T17:35:23+5:302023-04-22T17:36:47+5:30
या SUV 5 आणि 7-सीटर, अशा दोन्ही पर्यायांमध्ये आणली जाण्याची शक्यता आहे. हे सध्याच्या मारुती ब्रेझाचे रिबेस्ड व्हर्जन असू शकते असेही बोलले जात आहे.
भारतीय बाजारात स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) सेगमेंट वेगाने वाढताना दिसत आहे. यातच आता टोयोटा देखील सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. टोयोटाने भारतात Raize आणि Raize Space या दोन नव्या SUV कार ट्रेडमार्क केल्या आहेत. या SUV 5 आणि 7-सीटर, अशा दोन्ही पर्यायांमध्ये आणली जाण्याची शक्यता आहे. हे सध्याच्या मारुती ब्रेझाचे रिबेस्ड व्हर्जन असू शकते असेही बोलले जात आहे.
यापूर्वी टोयोटा, ब्रेझावर आधारित अर्बन क्रूझरची विक्री करत होती. जीने फारशी कमाल केली नाही. यामुळे नवीन एसयूव्ही टोयोटासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकते. असे बोलले जात आहे. खरे तर, हा ट्रेडमार्क टोयोटाकडून काही नवा नाही. ही एसयूव्ही आधीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे. जगभरात टोयोटा राईझची लांबी जवळपास 4 मीटर एवढी आहे.
डायमेन्शन आणि इंजिन -
ग्लोबल मार्केटमध्ये जी टोयोटा Raize उपलब्ध आहे तिची लांबी 3,995 मिमी तर रुंदी 1,695 मिमी एवढी आहे. ही कार कॉम्पॅक्ट साइज असूनही 17-इंचांच्या टायर्ससह येते. याशिवाय, या SUV मध्ये 369 लिटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे. जपानमध्ये हिची 1.0 लिटरच्या टर्बो-पेट्रोल इंजिनसह विक्री केली जाते. मात्र भारतात ही कार 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह लॉन्च केली जाऊ शकते.
हेच इंजिन मारुती ब्रेझामध्येही मिळते. हे इंजिन 100.6 PS पॉवर आणि 136 Nm टॉर्क जनरेट करू शखते. या कारला 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे कंपनी ही कार CNG व्हेरिअंटमध्येही लाँच करू शकते.
असे असू शकतात फीचर्स -
जर कंपनीने ही एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केली, तर हिच्यात काही अॅडव्हॉन्स फीचर्सचा समावेश केला जाईल. जे काही सध्याच्या मारुती ब्रेझामध्ये उपलब्ध आहेत. यात डुअल LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्रोम फ्रंट ग्रिल, 9 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टिम, सनरूफ, वायरलेस चार्जिंग, अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटो कनेक्टिविटी, TFT कलर डिस्प्ले, एम्बीएंट लायटिंग आणइ लेझर रॅपिड स्टिअरिंग व्हीलचा समावेश असू शकतो. या SUV च्या लॉन्च संदर्भात कंपनीने अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती जाहीर केलेली नाही.