मोदींनी देशात इथेनॉल फ्युअल केले लाँच; ११ राज्यांत मिळणार, पेट्रोलचे पैसे वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 08:31 PM2023-02-06T20:31:59+5:302023-02-06T20:32:31+5:30
पहिल्या टप्प्यात १५ महत्वाच्या शहरांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अन्य शहरांत पुढील दोन वर्षांत इथेनॉल फ्युअल उपलब्ध होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया एनर्जी वीक (IEW) 2023 मध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल लाँच केले आहे. गेल्या काही वर्षांपासून मोदी सरकार इथेनॉलचा वापर वाढवण्याचा प्रयत्न करत होते. आज त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा (E-20) वापर सुरू करण्यात येत आहे.
20 टक्के इथेनॉल असलेले इंधन देशातील विविध शहरांत टप्प्याटप्प्याने आणले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ महत्वाच्या शहरांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अन्य शहरांत पुढील दोन वर्षांत इथेनॉल फ्युअल उपलब्ध होईल. 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 84 पेट्रोल पंपांवर ई-20 पेट्रोल उपलब्ध करून दिले जाणार आहे.
E-20 हे एक रिफाईन्ड आणि मिक्स फ्युअल आहे. हे इंधन पेट्रोल आणि इथेनॉल मिसळून बनवले जाते. आतापर्यंत १० टक्के इथेनॉल वापरले जात होते. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. यामुळे हे पेट्रोल आणखी स्वस्त होणार आहे. E20 प्रायोगिक तत्त्वावर ठरविलेल्या वेळेपूर्वीच लाँच करण्यात आले आहे. या प्रकल्पाची मुदत २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ई-20 प्रोग्रॅमचा सर्वाधिक फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. अतिरिक्त उत्पन्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. गेल्या आठ वर्षांतील आकडेवारी पाहता इथेनॉल पुरवठादारांनी त्यातून ८१,७९६ कोटी रुपये कमावले आहेत, तर शेतकऱ्यांना ४९,०७८ कोटी रुपये मिळाले आहेत. परकीय चलन खर्चात देशाने 53,894 कोटी रुपयांची बचत केली. तसेच, यामुळे कार्बन-डायऑक्साइड (CO2) उत्सर्जन 318 लाख टन कमी झाले आहे.