महिंद्राच्या थारपेक्षाही महागडी! मारुतीची जिम्नी अखेर लाँच, किंमत पाहून डोळे विस्फारतील...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 11:41 AM2023-06-07T11:41:37+5:302023-06-07T11:43:57+5:30
Maruti Suzuki Jimny launched: गेल्या महिन्यात मारुतीच्या डीलरशीपमध्ये जिम्नीची बुकिंग सुरु झाली होती. थारपेक्षा जिम्नीची किंमत कमी असेल असा अंदाज लावला जात होता. परंतू, मारुतीने मोठ्या प्रमाणावर किंमत चढी ठेवली आहे.
गेल्या काही वर्षांपासून नुसती हुल देणाऱ्या मारुतीच्या जिम्नीची उत्सुकता आता संपली आहे. मारुती सुझुकीने आज ऑफरोड एसयुव्ही मारुती जिम्नी भारतात लाँच केली आहे. (Maruti Jimny Launched) या कारची किंमत महिंद्राच्या थारपेक्षाही जास्त आहे.
गेल्या महिन्यात मारुतीच्या डीलरशीपमध्ये जिम्नीची बुकिंग सुरु झाली होती. या कारची सुरुवातीची किंमत 12.74 लाख रुपयांपासून सुरु होते, तर टॉप मॉडेलची किंमत 15.05 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे.
मारुतीची जिम्नी महिंद्राच्या रिअर व्हील ड्राईव्ह थारपेक्षा जवळपास सव्वा दोन लाखांनी जास्त आहे. थारपेक्षा जिम्नीची किंमत कमी असेल असा अंदाज लावला जात होता. परंतू, मारुतीने मोठ्या प्रमाणावर किंमत चढी ठेवली आहे. थारची किंमत 10.54 लाख रुपयांपासून सुरु होते.
मारुतीने जिम्नीचे सहा व्हेरिअंट लाँच केले आहेत. पहा त्यांची किंमत...
Zeta MT - रु. 12.74 लाख
Zeta AT - 13.94 लाख रुपये
अल्फा एमटी - रु. 13.69 लाख
अल्फा एटी - रु. 14.89 लाख
अल्फा एमटी (ड्युअल टोन) - 13.85 लाख रुपये
अल्फा एटी (ड्युअल टोन) - रु. 15.05 लाख
कंपनीने 1.5-लिटर के-सीरीज नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 103 bhp ची ताकद आणि 134 Nm टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आले आहेत.
मायलेज
जिम्नीचे मॅन्युअल व्हेरिअंट 16.94 kmpl मायलेज देत असल्याचा एआरएआयचा आकडा आहे. तर ऑटोमॅटिक वेरिएंट 16.39 किमी प्रति लिटर पेट्रोल एवढे मायलेज देते. एसयूव्हीमध्ये 40 लीटरची टाकी देण्यात आली आहे. यानुसार अनुक्रमे 678 किमी आणि 656 किमी एवढी रेंज मिळू शकणार आहे.