मोटारसायकलसाठी मागील चाकापुढे साडी गार्ड लावणे गरजेचेच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 02:00 PM2017-09-01T14:00:00+5:302017-09-01T14:00:00+5:30
मोटारसायकलीच्या मागील चाकामध्ये महिलांच्या साड्या वा ओढण्या अडकू नयेत यासाठी साडीगार्ड हे मोटारसायकलीसाठी तयार केले गेलेले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्याचा प्रत्येक मोटारसायकलधारकाने नक्कीच विचार करायला हवा.
भारतातील जीवनशैली ही अन्य देशांपेक्षा तशी भिन्न आहे. येते दुचाकी विशेष करून मोटारसायकल वापरण्याचे प्रमाण गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे.शहरापासून ग्रामीण भागापर्यंत मोटारसायकलीचा वापर हा अगदी कौटुंबिक वाहन म्हणून होत असतो. या मोटारसायकलीवरून अनेकजण आपल्या पत्नीला, बहिणीला, मुलीला मागे बसवून नेतात.
भारतात अजून तरी अनेक ठिकाणी महिला साड्या किंवा पंजाबी ड्रेस, ओढणी याचा वापर करतात. मोटारसायकलीवरून जाताना या पद्धतीच्या वस्त्रप्रावरणाचा विचार करता साड्या वा ओढण्या चाकामध्ये अडकण्याची व दुर्घटना होण्याचीही शक्यता असते.यामुळेच मोटारसायकलीवरून जाताना अशा प्रकारच्या वस्त्रांचा वापर करून मागे बसताना खूपच सावधाता बाळगावी लागते. काहीवेळा कितीही दक्षता घेतली तरी साडीचा पदर वा ओढणी मागील चाकात अडकण्याची शक्यता असते. अनवधानाने तसे घडू शकते. खरे म्हणजे या चाकामध्ये असे काही अडकून बसू नये यासाठी मोटारसायकलीच्या डाव्या बाजूला जाळीदार ग्रीलसारखे तयार केलेले एक स्टील वा लोखंडाचे गार्ड तयार करण्यात आलेले आहे. त्याचा वापर मात्र सर्वच करतात असे नाही. कंपन्यांकडून ते पुरवण्यात येते असे नाही. अतिरिक्त साधनसामग्री म्हणून त्या गार्डकडे पाहिले जाते.
या प्रकारचे संरक्षण देणारे हे साधे सुटसुटीत असे साधन मोटारसायकलीला लावून घेतल्याने काही फार मोठा त्रास होत नाही, दोन पैसे खर्च झाले तरी त्यामुळे संभाव्य मोठे नुकसानही टळू शकते, हे मोटारसायकल घेणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. आजकाल नव्या पिढीतील महिलांचा वेष काही प्रमाणात बदलत असला, पाश्चिमात्य पद्धतीचा पेहराव केला जात असला तरी सरसकट महिलांची वस्त्रे काही बदललेली नाहीत. अजूनही पारंपरिक अशीच आहेत. कधी कुणा पारंपरिक वस्त्र धारण केलेल्या महिलेला जर मोटारसायकलवर बसण्याची वेळ आली तर तिला ते किती त्रासदायक होऊ शकते, त्याचा विचार प्रत्येक मोटारसायकल घेणाऱ्याने करायला हवा.
विशेष करून ग्रामीण व निमशहरी भागांमध्ये तर अशा प्रकारची साडीगार्ड मोटारसायकलींना बसवून घेणे गरजेचे आहे असे वाटते. काही वेळा दुचाकी तयार करणाऱ्या या कंपन्यांनीच अतिशय गरजेच्या अशा अतिरिक्त साधनांचा वापर करून त्या दुचाकी ग्राहकांना द्यायला हव्यात. अनेकदा अतिरिक्त साधनसामग्रीची उपलब्धता ग्रामीण वा निमशहरी भागांमध्येही असत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या साधनांची आवश्यकता कंपन्यांनीही समजून ती साधने ग्राहकांना मोटारसायकल देतानाच द्यायला हवीत.