आवश्यक हत्यारांचे टूलकीट नेहमीच सज्ज असणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:34 PM2017-09-15T22:34:06+5:302017-09-15T22:34:16+5:30
कारमध्ये आवश्यक अशी हत्यारे असणे अडीअडचणीच्या कामाला गरजेची असतात. ती नीट ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. मेकॅनिक काही प्रत्येकवेळी तुम्हाला मिळत नाही वा उपयोगाला येत नाही, तुमचे काम काहीवेळा तुम्हालाच करावे लागते.
कार- मोटार ही तुमची एक जबाबदारी असते, त्या कारचा वापर तुम्ही तुमच्या केवळ कुटुंबासाठी वा तुमच्यासाठी करीत असला तरी कारच्या प्रवासामध्ये येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींसाठी काही हत्यारे, साधनसामग्रीचा एक आवश्यक असा संच आपल्या कारमध्ये तयार आहे की नाही, तो खराब झालेला नाही, याचीही खात्री करीत जा. अनेकदा कार पंक्चर होण्याचे, दरवाजा नीट न लागण्याचे, वायपर बदलण्याचे, हेडलॅम्प वा टेललॅम्प बदलण्याचे प्रसंग येत असतात. त्या त्यावेळी तुम्हाला मेकॅनिक मिळेलच असे नाही. तसेच अनेक कामे ही मेकॅनिकऐवजी तुम्हीच स्वतः करू शकता. पण होते काय की बहुतांशीवेळा आपण ती कामे मेकॅनिक मिळाल्याने विनासायास करून घेतो. त्यामुळे आपल्या कारमध्ये असलेल्या साधनांचा वापरही होत नाही, त्या साधनांकडे पाहाण्याचीही आपल्याला गरज वाटत नाही. मात्र काहीवेळा नेमकी गरज लागते तेव्हा त्या साधनांना आपण हातात घेतो, त्यावेळी नेमकी ती काही ना काही खराब असल्याचे, अस्वच्छ वा गंज चढल्यासारखी असल्याचे आढळून येते. अगदी साधी पकड घ्यायची म्हटली तरी ती अनेक महिने वापरली नसेल, नीटपणे ठेवलेली नसेल तर ती गंज पकडला गेल्यास वापरता येणे कठीण होते. मग त्यात रॉकेलचा वापर करून तिचा गंज सोडवून ती पकड कामासाठी सुकर होईल, अशी करून घ्यावी लागते. स्क्रूड्रायव्हर नुसताच ठेवला असेल तर खराब होणार नाही. मात्र त्याच्या मुठीला काही ना काही दमटपणामुळे ओशटपणा येण्याचीही शक्यता असते.
कारमध्ये आवश्यक अशा टुल कीटमध्ये कार उचलण्याचा जॅक, पाना, स्क्रूड्रायव्हर, साधी पकड, नोज प्लायर, इन्शुलेशन टेप, ब्लेड, छोटी हॅक्सॉ, कात्री, कटर, टूसाईड अडेसिव्ह टेप, हेडलॅम्पचे अतिरिक्त बल्ब, टॉर्च, ऑईल, कॉटनवेस्ट (हात पुसण्यासाठी किमान पातळसर कॉटनचे फडकं) किमान या साधनांचा संच नेहमी कारमध्ये नीटपणे ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी काही कामांना मेकॅनिक मिळेल असेही नाही, इतकेच कशाला काहीवेळा काही कामे मेकॅनिक ऐवजी तुम्हालाच करणे भाग पडत असते, हे लक्षात घेता अशा प्रकारच्या कामांसाठी टूल कीट चांगल्या स्थितीत तुम्हाला मिळाला तर त्याद्वारे काम करता येऊ शकते. तसेच त्या साधनांना आयत्यावेळी साफसूफ करण्याची आवश्यकता भासणार नाही.