स्टेपनीही ठेवा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:57 PM2017-08-02T16:57:22+5:302017-08-03T13:16:48+5:30
कारमध्ये दिली जाणारी स्टेपनी म्हणजे अतिरिक्त व्हील व टायर नेहमी तयारीत ठेवा टायर पंक्चर झाला तर अडीअडचणीला तीच स्टेपनी कामी येत असते.
टायर कधी पंक्चर होईल ही वेळ कधी कधी सांगून येत नाही. पण त्यासाठी तुमच्या कारमध्ये असलेली स्टेपनी म्हणजे तुमच्या प्रवासातील तुमच्या अडचणीतून सुटल्याचा एक मोठा सुटकेचा निश्वास असतो हे कायम लक्षात ठेवा. प्रत्येक कारला सर्वसाधारणपणे एक स्टेपनी दिलेली असते. स्टेपनीमध्ये व्हील, टायर. ट्यूब वा ट्यूबलेस टायर याचा समावेश असतो. डिक्कीमध्ये ठेवलेली वा एसयूव्हीला मागच्या दाराला अटॅच केलेली ही स्टेपनी प्रवासात टायर पंक्चर झाला व जवळपास पंक्चर काढण्याची सुविधा नसेल तर लगेच पंक्चर टायरव्हील हटवून या स्टेपनीचा वापर करून पुढील प्रवास सुरू ठेवता येतो. अलीकडच्या काळात स्टेपनीकडे कोणी फारसे लक्ष देत नाही, शहरात फार त्या स्टेपनीचा वापर करण्याची आवश्यकता भासत नाही. पण तरीही स्टेपनी गरजेची असते व तिच्यामधील हवेचे प्रेशर तपासून ती नीट चालू अवस्थेत ठेवणे गरजेचे असते. साधारणपणे कारची ही सर्व व्हील्स सारखी असतात. अलॉय व्हील मात्र चारच दिली जातात व एक स्टेपनीसाठी नेहमीचे साधे व्हील दिले जाते. वास्तविक टायर रोटेशनमध्ये या स्टेपनीचाही वापर करायला हवा पण आजच्या काळात या स्थितीमुळे ही उठाठेव कोण करीत नाही. तुमच्या कारचे स्टेपनीसहीत सर्व व्हील व टायर सारखे असतील तर टायर रोटेशनमध्ये स्टेपनीही कार्यरत ठेवा. त्यामुळे स्टेपनी नेहमी यथास्थित राहाण्यास मदत होईल. स्टेपनी अशा प्रकारे बदलली जात नसली तरी ती नेहमीच तयारीमध्ये असायला हवी. अन्यथा त्या स्टेपनीचा उल्लेख केवळ कागदोपत्रीच असेल. स्टेपनी ही जितकी गरजेची आहे तितकीच ती बदलण्यासाठी लागणारी साधनेही कारमध्ये नीट आहेत ना याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. गाडी उचलणारा जॅक, पाना आदी साधने असणे व ती चांगल्या स्थितीत असणेही कायम आवश्यकच समजा. थोडक्यात स्टेपनीला दुर्लक्षित करून तिला स्टेपमदरली वागणूक देऊ नका. अडीअडचणीत तीच कामी येणार आहे.