न पाहिले कधी! स्कूटरलाही आला रिव्हर्स गिअर; पियाजिओची करामत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 08:32 AM2020-02-18T08:32:54+5:302020-02-18T08:34:41+5:30
कंपनीने सध्या या स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही, परंतू ही स्कूटर बजाज, हिरोच्या स्कूटरना टक्कर देणारी असून तीची किंमत 1 ते 1.25 लाखांच्या आसपास असण्य़ाची शक्य़ता आहे.
दिल्ली : इटलीच्या पियाजिओ ग्रुपने पहिली इलेक्ट्रीक स्कूटर व्हेस्पा लाँच केली आहे. ऑटो एक्सपो 2020 मध्ये ही स्कूटर शोकेस करण्यात आली. या स्कूटरची खास बाब अशी की रिव्हर्स गिअर देण्य़ात आलेला आहे. ही या फिचरची भारतातील पहिलीच स्कूटर आहे.
कंपनीने सध्या या स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही, परंतू ही स्कूटर बजाज, हिरोच्या स्कूटरना टक्कर देणारी असून तीची किंमत 1 ते 1.25 लाखांच्या आसपास असण्य़ाची शक्य़ता आहे. सीईओ डियागो ग्राफी यांनी सांगितले की भारतात इलेक्ट्रीक स्कूटरची वाढती बाजारपेठ पाहता या स्कूटरला खासकरून भारतासाठी तयार करण्यात आले आहे. ही स्कूटर 5 रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
यामध्ये 4kW ब्रशलेस डीसी मोटार लावण्यात आली आहे. ही मोटर 5.4 बीएचपी ताकद आणि 200 एनएम टॉर्क तयार करते. यामध्ये 4.2 kWh ची लिथिअम आयनची बॅटरी देण्यात आली असून इको मोडवर ही स्कूटर 100 किमी पर्यंत धावू शकते. तर पावर मोडवर 70 किमी एवढे अंतर कापते. पावर मोडवर ही स्कूटर ताशी 70 किमी आणि इको मोडवर ताशी 45 किमी वेगाने धावू शकते.
या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी देण्यात आली असून व्हेस्पाच्या मोबाईल अॅपद्वारे कनेक्ट करता येणार आहे. यामध्ये 4.3 इंचाची फुल डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे जो टीएफटी डिस्प्लेचा आहे. सीटच्या खाली मोठी स्टोरेज स्पेस देण्यात आलेली असून ज्यामध्ये हेल्मेटही ठेवता येते. याशिवाय़ बॅटरी रिचार्ज करण्यासाठी केबलही मिळते. या केबलद्वारे घरी किंवा बाहेर स्कूटर चार्ज केली जाऊ शकते. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तासांचा वेळ लागतो.