Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
By हेमंत बावकर | Published: May 6, 2024 11:55 AM2024-05-06T11:55:03+5:302024-05-06T12:00:30+5:30
Nexon EV Review Long Run: कारची रेंज ही तुम्ही कोणता रस्ता निवडता यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. आम्ही दुपारच्या तळपत्या उन्हात, रात्रीच्या पुण्यातील ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळात चालवून पाहिली.
ईलेक्ट्रीक गाड्या आता तर गावागावात दिसू लागल्या आहेत. सुरुवातीला शहरी लोक धाडस करत होते, परंतू आता गावाकडचे लोडशेडिंगमध्ये राहणारे लोकही ईव्ही बाळगू लागले आहेत. अद्याप या ठिकाणी चार्जिंग स्टेशन नसली तरी देखील घरच्या कनेक्शनवर ईव्ही चार्ज केली जातेय. आम्ही जवळपास आठवडाभर टाटा नेक्सॉन ईव्ही गाव ते शहर एकाबाजुचे सुमारे १२० किमी अंतर अशी तीन-चार फेऱ्यांनी चालवून पाहिली. रोजच्या प्रवासासाठी ही कार आम्हाला कशी वाटली....
नेक्सॉन ईव्हीचे आता नवे फेसलिफ्ट आले आहे. यामुळे बऱ्यापैकी अनुभव आता कंपनीच्या गाठीशी आहे. चार-पाच वर्षांपूर्वीची चार्जिंग स्टेशनची अवस्था आणि आताची परिस्थिती यात बराच फरक झाला आहे. घरच्या कनेक्शनला जर चांगले अर्थिंग असेल तर रोजच्या २००-२५० च्या प्रवासाला मागेपुढे पहायला नको, अशी ही कार आहे. घरच्या कनेक्शनवर १० ते १४ रुपये एक युनिट आणि बाहेरच्या चार्जिंग स्टेशनवर २५ ते ३० रुपये असा दर आकारला जातो.
रेंजबाबत बोलायचे झाले तर आम्ही फलटण, बारामती ते पुणे असा तीन ते चारवेळा ये-जा प्रवास केला. नेक्स़ॉन ईव्हीने या प्रवासात दरवेळी २४० किमीसाठी ७० टक्के बॅटरी वापरली. येजा करूनही शेवटच्या थांब्याला ३० टक्के बॅटरी शिल्लक असायची. म्हणजेच जवळपास १% बॅटरी तीन किमी अंतर पार करत होती. विचारात घेण्यासारखी बाब म्हणजे भयंकर उकाड्याच्या दिवसात ही कार फुल एसीमध्ये चालविण्यात आली.
कारची रेंज ही तुम्ही कोणता रस्ता निवडता यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. आम्ही दुपारच्या तळपत्या उन्हात, रात्रीच्या पुण्यातील ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळात चालवून पाहिली. वाहनांना ओव्हरटेक मारणे, चढ आणि उतार या गोष्टीदेखील रेंजवर परिणाम करतात. आम्हाला रेंजची भीती या जवळपास ९०० किमीच्या प्रवासात कधीच वाटली नाही. हायवेला फास्ट चार्जरही होते. त्यांच्या भरवशावर आम्ही हा प्रवास करून पाहिला.
साधारण १ ते १०० टक्के नेक्सॉन ईव्हीचे सर्वात टॉपचे म़ॉडेल चार्ज होण्यासाठी ४० युनिट लागतात. म्हणजेच ३०० किमीसाठी १० रुपयांप्रमाणे हिशोब पकडला तर ४०० रुपये आणि १३-१४ रुपयाने हिशोब पकडला तर ५५० ते ६०० रुपये खर्च येत होता.
सध्या ईलेक्ट्रीक कार किंवा दुचाकी ही रनिंग जास्त असेल तर इंधनावरील पैसे वाचविण्यासाठी घेतली जाते. नेक्सॉन ईव्ही दोन शहरांमध्ये व्यवसाय, नोकरी, वास्तव्य असलेले व्यक्ती घेऊ शकतात अशी आहे. केबिन पूर्णपणे सायलंट, मोटरचा फारसा आवाज नाही यामुळे टायरचा आवाज थोडासा जाणवतो. परंतू तो बऱ्यापैकी कमी आहे. पिकअप तर डिझेल कारनाही लाजवेल असा आहे. यामुळे वाहतूक कोंडी, चढणीला कार थांबवावी लागली तर मागे जायची झंझटच राहत नाही.
टाईम करेक्शन...
ओव्हरटेक करतानाचा कॉन्फिडन्स यामुळे वाढतो. पेट्रोल, डिझेल, सीएनजी कारच्या पिकअपच्या त्रासामुळे अनेकदा प्रवासात उशीर होतो किंवा ओव्हरटेक करण्याची वेळ हुकते व बराचवेळ चांगल्या संधीची वाट पहावी लागते. हे टाईम करेक्शन ईव्हीमुळे शक्य झाले आहे. कारण या गाड्यांना पिकअप जास्त असतो. जर तुम्ही ईको मोडवर असाल तर पटकन वेग घेऊन ओव्हरटेक करण्यासाठी स्पोर्ट मोड बदलून पुन्हा ईकोवर येऊ शकता.
पूर्ण पॅकेज एकाच कारमध्ये...
व्हेंटिलेटेड सीट्स असल्याने जर उन्हाळ्यात कार आतून तापलेली असेल तर पटकन ती थंड करता येते. लांबच्या प्रवासात घामामुळे त्रस्त होता येत नाही. या सीट थोड्या लाईट ग्रे कलरच्या असल्याने त्या मेंटेन ठेवाव्या लागणार आहेत. एसी कमी आधिक केल्यावर त्याचा रेंजवर परिणाम बऱ्यापैकी जाणवत होता.
या कारला सनरुफ आहे. तो बंद जरी ठेवला तरी त्याचे कव्हर पातळ असल्याने डोक्याला उष्णता जाणवत होती. यामुळे आतमध्ये कुलिंगसाठी एसी कमी तापमानावर सेट करावा लागत होता. ऑटो ठेवला तरी वरच्या उष्णतेमुळे एसी चांगलाच वापरला जात होता. याचा परिणाम रेंजवर होत होता. टाटाने याकडे लक्ष द्यायला हवे. यामुळे काही टक्के का होईना बॅटरी वाचणार आहे.
खड्डे मुळीच जाणवत नव्हते. बुट स्पेसही मोठी देण्यात आली आहे. यामुळे आरामात चार पाच जणांचे साहित्य नेता येऊ शकते. जेवढे कमी न्याल तेवढी जास्त रेंज. दरवाजांमध्ये देखील चांगली स्पेस देण्यात आली आहे. प्रवाशांना लेगस्पेसही चांगली आहे. यामुळे मागे आणि पुढे सहा फुट उंच व्यक्ती आरामात बसू शकतात. म्युझिक सिस्टिम तर अप्रतिम आहे. एन्फोटेन्मेंट स्क्रीन, स्मार्ट डिजिटल स्टिअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, अचूक रेंज आदीमुळे ही कार चालविणे एक चांगला अनुभव देते. प्रिमिअम गाड्यांचे पॅकेज यामध्ये देण्यात आले आहे.
कोणी घ्यावी...
जर तुमचे रनिंग खूप असेल तर नेक्सॉन ईव्हीकडे जाण्यास हरकत नाही. ज्यांच्याकडे चार्जिंगटे टेन्शन नाही, वाटेत ईव्ही फास्ट चार्जर आहेत, अशांनी ईव्ही कारकडे वळावे. रोजची सवय झाली तर तुम्ही ३४०-३५० ची किंवा त्यापेक्षा जास्तीची रेंज आरामात मिळवू शकता. ३६० डिग्री कॅमेरामुळे तुम्हाला एसयुव्ही असली तरी वळविताना, पार्क करताना घाबरण्याची गरज वाटत नाही.