‘या’ कंपनीसाठी गेम चेंजर ठरली ₹५.९९ लाखांची जबरदस्त SUV, लाखापेक्षा जास्त विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 11:38 AM2023-04-03T11:38:34+5:302023-04-03T11:39:14+5:30
कंपनीच्या कारनं विक्रीत नोंदवली मोठी वाढ. या स्वस्त आणि मस्त एसयुव्हीला मिळतेय ग्राहकांची पसंती.
निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं (NMIPL) 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 94,219 युनिट्सची विक्री केल्याची माहिती दिली आहे. या कालावधीत कंपनीनं विक्रीत तब्बल 23 टक्क्यांची वाढ नोंदवली. दरम्यान, देशांतर्गत घाऊक विक्री 33611 युनिट्सची आणि 60608 युनिट्सची निर्यात केली. मार्च 2023 मध्ये एकूण 10,519 युनिट्सची घाऊक विक्री झाली, ज्यामध्ये या महिन्यात 73 टक्क्यांची वाढ झाली. त्याचप्रमाणे देशांतर्गत घाऊक विक्रीचा आकडा 3260 युनिट इतका होता, तसंच 7259 युनिट्सची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात 3007 युनिट्सची विक्री झाली होती आणि 4976 युनिट्सची निर्यात करण्यात आली होती.
ठरली गेम चेंजर
निसान मॅग्नाईट (Nissan Magnite) लाँच झाल्यापासून ही कार त्याच्या सेगमेंटमध्ये गेम चेंजरची भूमिका बजावत आहे. ही मेक-इन-इंडिया SUV निसानसाठी एक यश असल्याचं म्हटलं जातंय. भारताच्या देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात बाजारपेठेत या कारनं 1 लाखाहून अधिक ग्राहक बुकिंग नोंदवली आहेत. बी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये ती पसंतीची एसयूव्ही ठरली आहे. या कारचं डिझाइन जपानमध्ये करण्यात आलं असून भारतात या कारचं उत्पादन करण्यात आलंय.
'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' यावर आधारित निसाननं 2022-23 मध्ये 1 मिलियन युनिट्सचा निर्यातीचा टप्पा ओलांडला आहे. निसान इंडियानं सप्टेंबर 2010 मध्ये निर्यात सुरू केली आणि सध्या त्याच्या चेन्नई येथील रेनो-निसान ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड प्लांटमधून न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, मध्य पूर्व आशियाई देश, लॅटिन अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया, सार्क देश आणि अनेक युरोपीय देशांसह 108 देशांमध्ये निर्यात केली जाते.
BS6 स्टेज-2 नुसार उत्पादन
निसानने 1 एप्रिल 2023 रोजी BS6 स्टेज-2 एमिशन नॉर्म्स लागू होण्यापूर्वीच, मॅग्नाइटची BS6 स्टेज-2 RDE-कम्पियंट व्हेरिअंट बाजारात आणलं आहे. 2023 निसान मॅग्नाईट सर्व कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट सुरक्षा फीचर्ससह येते. या कारला GNCAP 4.0 रेटिंग मिळालं आहे.
कंपनीचे ग्लोबल सीओओ अश्वनी गुप्ता यांनी अलीकडेच भारतात 600 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 5300 कोटी रुपयांच्या गुंतवण्याच्या योजनांची माहिती दिली होती. निसान इंडिया ईव्ही श्रेणीतील तीन नवीन मॉडेल्स, दोन सी-सेगमेंट एसयूव्ही आणि एक ए-एसयूव्ही सादर करणार आहे.