मिथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी नीती आयोग आग्रही, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 10:56 AM2018-08-07T10:56:35+5:302018-08-07T10:57:58+5:30
वाहनांपासून होणारे प्रदुषण 40 टक्क्यांनी कमी होईल. तसेच मोठा फायदा म्हणजे 2030 पर्यंत 100 दशलक्ष डॉलर वाचतील.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असतानाच भारतीयांची इंधनाची मागणी काही कमी होत नाहीय. यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळी खर्ची पडत असल्याने नीती आयोगाने पेट्रोलमध्ये 15 टक्के मिथेनॉल मिसळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारसमोर ठेवला आहे. सध्या पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्यात येते.
मंत्रीमंडळाची परवानगी मिळाल्यास देशाचा 10 टक्के खर्च वाचणार आहे. नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारसोबत उच्च स्तरीय बैठक घेतली. यामध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
इथेनॉलची किंमत 42 रुपये प्रती लिटर आहे. तर मिथेनॉलची 20 रुपये प्रती लिटर. यामुळे इथेनॉलएवजी मिथेनॉलचा वापर केल्यास प्रती लिटरमागे 22 रुपये वाचणार आहेत. मात्र, यासाठी वाहनांच्या इंजिनांमध्येही बदल करावे लागणार आहेत. यासाठी वाहन क्षेत्राचीही सहमती आवश्यक असणार आहे. सध्या उत्पादित होणारी वाहने ही 18-20 टक्के इथेनॉल मिश्रीत इंधनावर धावू शकणारी आहेत. मिथेनॉलच्या वापरासाठी कंपन्यांना संशोधन करावे लागणार असल्याचे सियामचे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले.
प्रामुख्याने इथेनॉल हे साखर कारखान्यांतून बनविले जाते. तर मिथेनॉल हे दगडी कोळशापासून. यामुळे उपलब्धी ही देखील महत्वाची ठरणार आहे. देशात साखर कारखाने मुबलक असल्याने इथेनॉल मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहे. तसेच इथेनॉलचे प्रमाण 10 टक्क्यांवरून 20 ते 25 टक्क्यांवर नेण्याची मागणीही गेल्या काही काळापासून कारखानदारांकडून होत आहे. मात्र, दगडी कोळशाच्या खाणी कमी प्रमाणावर असल्याने मिथेनॉलचा मुबलक पुरवठा कसा होणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. महत्वाचे म्हणजे सध्या केवळ पेट्रोलमध्येच मिथेनॉल मिसळण्याचा प्रस्ताव असला तरीही पुढे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यास मिथेनॉल मिश्रीत डिझेलची विक्रीही करण्यात येणार आहे.
फायदे कोणते ?
पेट्रोलमध्ये 15 टक्के मिथेनॉल मिसळल्यास पेट्रोलची किंमत 10 टक्क्यांनी कमी होईल. इंधनासाठी मध्यपूर्वेकडील देशांवरील अवलंबित्व कमी होऊन चीनकडून मिथेनॉलची खरेदी करता येईल. वाहनांपासून होणारे प्रदुषण 40 टक्क्यांनी कमी होईल. तसेच मोठा फायदा म्हणजे 2030 पर्यंत 100 दशलक्ष डॉलर वाचतील.
किती इंधन लागते?
भारत हा इंधन आयात करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार आहे. वर्षाला 2900 कोटी लिटर पेट्रोल आणि 9 हजार कोटी लिटर डिझेल लागते. तसेच इतर पेट्रोलियम उत्पादनांसाठी मिळून 5 लाख कोटी लिटर इंधन आयात करावे लागते.
मिथेनॉलची निर्मिती कुठे ?
भारतामध्ये मिथेनॉलच्या निर्मितीसाठी पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. यासाठी दोन्ही राज्यांनी कोळसा खाणी राखीव ठेवल्या आहेत. हे प्रकल्प यशस्वी झाल्यास सरकार मिथेनॉलचे उत्पादन सुरु करणार आहे. मात्र, तोपर्यंत किमान चार वर्षे चीनवर अवलंबून रहावे लागेल. तसेच 100 कोटी खर्च करून पुणे, हैदराबाद आणि त्रिची येथे संशोधन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.