“पेट्रोल-डिझेल नाही, EV नाही; ‘या’ इंधनावर चालणारी कार खरेदी करणार, तेच भविष्य”: नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 02:17 PM2021-11-23T14:17:11+5:302021-11-23T14:17:56+5:30
देशात २५० स्टार्टअप कंपन्या ई-वाहनांवर काम करत आहेत आणि यामुळे लवकरच इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होईल, असे गडकरी म्हणाले.
नवी दिल्ली: आताच्या घडीला पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. देशातील ग्राहकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे अधिक वाढताना दिसत आहे. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल, डिझेल नाही, इलेक्ट्रिकही नाही, तर हायड्रोजनवर चालणारी कार खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच हायड्रोजन इंधन हे भविष्य असल्याचा दावाही गडकरी यांनी केला आहे.
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी पुढील महिन्यात एक कार खरेदी करणार आहे, जी हायड्रोजनवर चालेल. तसेच विमान इंधनात ५० टक्के इथेनॉल वापरण्यास प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
गडकरी खरेदी करणार हायड्रोजन इंधनावर चालणारी कार
देशात २५० स्टार्टअप कंपन्या ई-वाहनांवर काम करत आहेत आणि यामुळे लवकरच इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होईल. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही चांगली वाढ होत आहे. हायड्रोजन इंधन हे भविष्य असून, मी पुढील महिन्यात एक कार खरेदी करणार आहे, जी हायड्रोजनवर चालेल, असे गडकरी यांनी सांगितले. तसेच सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यास आणि इथेनॉल, बायो-एलएनजी, ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे, परंतु अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) वाहनांचे रजिस्ट्रेशन थांबणार नाही, असेही गडकरी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
इथेनॉल, बायो-एलएनजी, ग्रीन हायड्रोजनला प्रोत्साहन
लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली आहे. आम्ही इथेनॉल, बायो-एलएनजी, ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनाच्या इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) प्रोत्साहन देत आहोत. आयसीई वाहनांचा वापर थांबवण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, असेही गडकरी म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी इलेट्रिक वाहनांची आणि पेट्रोल-डिझेल यांच्या कारच्या किमती येत्या काही काळात समान पातळीवर येतील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले होते.