ना Driving Licence चं टेन्शन, ना रजिस्ट्रेशन; ८० रुपयांत ८०० किमी धावणार ही E-Bike
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 06:29 PM2023-02-21T18:29:13+5:302023-02-21T18:29:29+5:30
इलेक्ट्रीक दुचाकींची मागणी सातत्यानं वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे खिशावरही मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे.
इलेक्ट्रीक दुचाकींची मागणी सातत्यानं वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे खिशावरही मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्याच वेळी, सरकार इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देत आहे, जेणेकरून पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व कमी करता येईल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका इलेक्ट्रीक वाहनाबद्दल सांगणार आहोत जे सायकलच्या श्रेणीत येते. मात्र, अशा वाहनांना जागतिक बाजारपेठेत 'ई-बाईक' असंही म्हटलं जातं. या इलेक्ट्रीक सायकल किंवा ई-बाईकची खास गोष्ट म्हणजे ती चालवण्यासाठी तुम्हाला ना ड्रायव्हिंग लायसन्सची (Driving Licence) गरज आहे ना रजिस्ट्रेशनची गरज आहे. दरम्यान, तुलनेनं त्याची किंमतही खूप कमी आहे.
एस्सेल एनर्जीचे प्रसिद्ध मॉडेल GET 1 तुमच्यासाठी सामान्य दैनंदिन वापरासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये एका स्कूटरप्रमाणेच चांगली स्पेस देण्यात आली असून फूटबोर्ड आणि स्टोरेज स्पेसही देण्यात आली आहे. 16Ah बॅटरी पॅक फुल मॉडेलची किंमत 43,500 रुपये आणि 13Ah बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत 41,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की GET1 एका चार्जवर 50 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते.
पॉवर आणि परफॉर्मन्स
यापूर्वी म्हटल्याप्रमाणे, ही ई बाईक दोन भिन्न लिथियम बॅटरी पॅकसह बाजारात उपलब्ध आहे, एका व्हेरिअंटमध्ये 13Ah क्षमतेची बॅटरी आहे आणि दुसर्या प्रकारात 16Ah क्षमतेची बॅटरी आहे. फक्त 39 किलो वजनाच्या GET 1 सायकलमध्ये, कंपनीने 250 वॅट्स आणि 48 व्होल्ट क्षमतेची BLDC रियर हब इलेक्ट्रीक मोटर वापरली आहे. यामध्ये एक डिस्प्ले देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये बॅटरी रेंजशी संबंधित माहिती दाखवली जाते.
काय आहेत फीचर्स?
एस्सेल गेट 1 च्या आरामदायी राइडसाठी, कंपनीने ड्युएल शॉकर्स सस्पेंशन दिले आहे. कंपनी आपल्या बॅटरीसह 2 वर्षांची वॉरंटी आणि इलेक्ट्रीक कंपोनंट्ससाठी 1 वर्षाची वॉरंटी देत आहे. जरी त्याचा टॉप स्पीड ताशी 25 किलोमीटर इतका असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने ब्रेकिंगसाठी मोटर कट ऑफ सिस्टीम देण्यात आली आहे. ड्रायव्हरची सीट थोडी उंच ठेवण्यात आली आहे तर मागील सीट कमी आहे ज्याचा वापर कॅरिअर म्हणून देखील केला जाऊ शकतो. समोरची सीट अॅडजस्टेबल असली तरी ती तुम्ही तुमच्या गरजेनुसार अप डाऊन करू शकता. छोटी बॅटरी असलेली सायकल पूर्ण चार्ज व्हायला जवळपास 5 तास आणि मोठी बॅटरी असलेली सायकल चार्ज व्हायला 6-7 तासांचा कालावधी लागतो.
दरम्यान याची रनिंग कॉस्ट 10 पैसे प्रति किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. म्हणजेच 1 रुपयांचा 10 किमी आणि 80 रुपयांत तुम्ही 800 किमीचा प्रवास करून शकता. ही रनिंग कॉस्ट घरगुती इलेक्ट्रिसिटीच्या किंमतीवर अवलंबून आहात.