पीयूसी नाही, वाहन विमा विसरा; भरा हजारोंचा दंड, दुर्लक्ष करणं महागात पडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 10:15 AM2023-04-30T10:15:20+5:302023-04-30T10:15:31+5:30
वाहनाचा अपघात झाल्यास व प्रकरण न्यायालयात दाखल झाले तर केवळ पीयूसी नसल्यामुळे वाहन विमा नाकारला जातो.
मुंबई - दुचाकी असो वा चारचाकी; प्रत्येक वाहनापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक असते. पीयूसी नसेल तर नियमभंग मानून कारवाई होऊ शकते. वाहन तपासणी करून पीयूसी प्रमाणपत्र देण्याकरिता मुंबईत पीयूसी सेंटर कार्यरत आहे. मात्र, अनेक वाहनधारक वेळोवेळी वाहन तपासणी करीत नाहीत व पीयूसी प्रमाणपत्र सोबत बाळगत नाहीत. परिणामी, असे वाहन तपासणी मोहिमेत प्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्यास ५० रुपयांसाठी तब्बल २ ते ४ हजार रुपये दंड भरावा लागतो. शिवाय वाहनाचा अपघात झाल्यास व प्रकरण न्यायालयात दाखल झाले तर केवळ पीयूसी नसल्यामुळे वाहन विमा नाकारला जातो.
पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक
मोटार वाहन कायद्यानुसार सध्या वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
वाहन तपासणी पीसीमुळे वाहन किती प्रदूषण करते हे लक्षात येते.
हे प्रमाणपत्र काढण्यासाठी ५० रुपये खर्च येतो.
विनापीयूसी वाहन प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत दिसल्यास ५० रुपयांच्या पीयूसीसाठी किमान २ ते ४ हजार रुपयाचा दंड आकारला जातो.
पीयूसी नसल्यास विमा नाकारला जाऊ शकतो
एखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि संबंधित वाहनमालकाकडे वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर विमा नाकारला जाऊ शकतो.
प्रत्येकी २ हजारांचा दंड
दुचाकी, तीनचाकी, चारचाकी पेट्रोल, डिझेल वा सीएनजी प्रकारांतील वाहन पीयूसी नसताना तपासणी मोहिमेत आढळल्यास चालक आणि मालक यांना वेगवेगळा दंड आकारला जातो. पीयूसी नसलेले वाहन चालविताना स्वतः मालक आढळून आला तर दोन हजार रुपये दंड आणि मालक, चालक वेगळे असतील तर प्रत्येकी २ हजार याप्रमाणे चार हजार रुपये दंड वसूल केला जातो.