सबसिडी नाही तर ई-दुचाकीही घेणार नाही; विक्री ६२ टक्क्यांनी घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 10:24 AM2023-06-21T10:24:03+5:302023-06-21T10:24:19+5:30
सरकारी पोर्टल ‘वाहन’नुसार मेमध्ये दररोज सरासरी ३,३९५ ई-दुचाकींची विक्री झाली.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सबसिडीत कपात केल्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या रोजच्या विक्रीत ६२.६ टक्के घट झाली आहे. इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांची विक्री मात्र २५.५ टक्के तसेच इलेक्ट्रिक कारची विक्री १६.१ टक्के वाढली आहे.
सरकारी पोर्टल ‘वाहन’नुसार मेमध्ये दररोज सरासरी ३,३९५ ई-दुचाकींची विक्री झाली. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात हा आकडा घटून १,२७१ झाला. ई-वाहनांसाठी फेम-२ योजना एप्रिल २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. ५ वर्षांसाठी असलेली ही योजना मार्च २०२४ मध्ये संपेल.
अशी घटली सबसिडी
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी फेम-२ योजनेंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदीचा ८० टक्के निधी संपला आहे. त्यामुळे सरकारने दुचाकी वाहनांवरील प्रति किलोवॅट सबसिडी १५ हजार रुपयांवरून कमी करून १० हजार रुपये केली आहे.
एक्सफॅक्ट्री किमतीवरील कमाल सबसिडी मर्यादाही ४० टक्क्यांवरून घटवून १५ टक्के करण्यात आली आहे.
कंपन्यांनी वाढविले दर
सबसिडी घटल्यानंतर बहुतांश कंपन्यांनी जूनच्या पहिल्या सप्ताहात वाहनांच्या किमती वाढवल्या. साधारणत: ५ ते १० हजार रुपयांपर्यंत ई-दुचाकी महागल्या आहेत. तुलनेत पेट्रोलवरील दुचाकींच्या किमती कमी आहेत. परिणामी, ई-दुचाकींची विक्री घटली आहे.
ई-कारची मागणी कायम
वाहन मे १५ जून घट/वाढ
इलेक्ट्रिक दुचाकी ३,३९५ १,२७१ -६२.६%
पेट्रोल दुचाकी ४४,९२६ ४६,७५६ ४.०७%
एकूण दुचाकी ४८,३२१ ४८,०७७ -०.६१%
इलेक्ट्रिक तीनचाकी १,४३९ १,८०६ २५.५०%
इलेक्ट्रिक कार २५४ २९५ १६.१४%