टायर पंक्चर झाल्यावरही ‘नो टेन्शन’; केवळ ३-५ मिनिटांत हवा भरली जाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 07:58 AM2022-09-11T07:58:55+5:302022-09-11T07:59:14+5:30
प्रवासावेळी टायरमध्ये हवा कमी होणे, ट्यूबलेस टायरमध्ये पंक्चर इत्यादी बाबतीत ही मशीन खूपच उपयुक्त ठरते.
कारमधून कुटुंबासह लांबच्या प्रवासाला जाताना, लहान-मोठ्या समस्या दूर ठेवण्यासाठी काही आवश्यक गोष्टी जवळ असणे फायद्याचे ठरते. या वस्तूंमध्ये टूल किट, आपत्कालीन वैद्यकीय बॉक्स आणि टायर इन्फ्लेटर यांचा समावेश आहे. यातील टायर इन्फ्लेटर ही छोटी मशीन टायर पंक्चरसारख्या त्रासापासून वाचवते.
टायर इन्फ्लेटर म्हणजे काय?
टायरमध्ये हवा भरणाऱ्या मशीनला टायर इन्फ्लेटर म्हणतात. याचा आकार खूप लहान असतो. वाहनातील जागा वाचवण्यासाठी तुम्ही पोर्टेबल टायर इन्फ्लेटरदेखील घेऊ शकता.
कारमधूनच मिळते पॉवर, किंमत किती?
प्रवासावेळी टायरमध्ये हवा कमी होणे, ट्यूबलेस टायरमध्ये पंक्चर इत्यादी बाबतीत ही मशीन खूपच उपयुक्त ठरते. अशा परिस्थितीत टायरमध्ये हवा भरून तुम्ही बराच लांबपर्यंत प्रवास करू शकता, तसेच जवळच्या पंक्चरच्या दुकानापर्यंतही बिनदिक्कत जाऊ शकता. बाजारात अनेक टायर इन्फ्लेटर मिळतात जे कारच्या सिगारेट सॉकेटमध्ये कनेक्ट होतात. टायर इन्फ्लेटरसाठी १२ वॅट पॉवरची आवश्यकता असते, जी सिगारेट सॉकेटमधून पुरवली जाते. याच्यासोबत मोठी वायरही मिळते, त्यामुळे कारमधील सॉकेटला जोडून सहजपणे टायरमध्ये हवा भरता येते. हवा भरण्यासाठी तीन ते पाच मिनिटे लागतात. किंमत सुमारे १ हजार रुपयांपासून सुरू होते. काही इन्फ्लेटरना एलईडी बल्ब, डिस्प्लेचाही पर्याय मिळतो. त्यामुळे अंधारातही हवा भरणे सोपे जाते.