आता टोयोटाची बारी! मारुतीशी केलीय यारी, ४००० एसयुव्ही बोलविल्या माघारी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 12:25 PM2023-01-25T12:25:57+5:302023-01-25T12:26:18+5:30
ज्या समस्या मारुतीच्या गाडीत त्याच समस्या टोयोटाच्या गाडीत येणे स्वाभाविक होते. तेच झाले आहे.
मारुतीनंतर आता टोयोटाने आपल्या कार माघारी बोलविल्या आहेत. कारण मारुतीच्याच कार टोयोटा आपले ब्रँडिंग लावून विकत होती. यामुळे ज्या समस्या मारुतीच्या गाडीत त्याच समस्या टोयोटाच्या गाडीत येणे स्वाभाविक होते. तेच झाले आहे.
टोयोटाने देखील मारुतीसारख्याच दुसऱ्यांदा कार माघारी बोलविल्या आहेत. टोयोटाची मिड साईज एसयुव्ही अर्बन क्रूझर हायरायडरची 4026 यूनिट्स माघारी बोलविण्यात आली आहेत. यामध्ये मारुतीच्या ग्रँड विटारासारखीच सीट बेल्टमध्ये समस्या आली आहे.
मारुती सुझुकीने काही दिवसांपूर्वीच अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा कार माघारी बोलविल्या होत्या. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या होती. त्यास आठवडा उलटत नाही तोच ग्रँड व्हिटाराच्या 11,177 कार माघारी बोलविल्या आहेत. महत्वाचे म्हणजे ही कार पाच महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आली होती. 8 ऑगस्ट 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 या काळात ज्या ग्रँड विटारा बनविण्यात आल्यात त्यांच्यामध्ये सीटबेल्टची समस्या आहे. टोयोटाच्या देखील याच काळातील अर्बन क्रूझर माघारी बोलविण्यात आल्या आहेत.
मागील सीट बेल्ट माउंटिंग ब्रॅकेटमध्ये काही समस्या आहे ज्यामुळे ते सैल होत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत ते योग्यरित्या काम करू शकत नाही. मारुतीसारखीच टोयोटा देखील ग्राहकांशी संपर्क साधणार असून ही समस्या दुरुस्त केली जाणार आहे. या रिकॉलमध्ये समाविष्ट असलेल्या वाहनांच्या तपासणी आणि दुरुस्तीसाठी कंपनी कोणतेही शुल्क आकारणार नाही. डीलरशिपद्वारे वाहन मालकांशी फोन, संदेश किंवा ईमेलद्वारे संपर्क साधला जाईल.