आता गोबर गॅसवर धावणार गाडी! 6 नव्या इलेक्ट्रिक कार आणतेय Maruti; जाणून घ्या, कंपनीचा संपूर्ण प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 08:13 PM2023-01-27T20:13:16+5:302023-01-27T20:13:42+5:30
कंपनी बायोगॅस व्यवसायावरही लक्ष केंद्रित करेल. यात गुरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचे उत्पादन आणि पुरवठा केला जाईल. या बायोगॅसचा वापर सुझुकीच्या CNG मॉडेलसाठी केला जाऊ शकतो.
देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ईव्हीच्या विक्रीवरही याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. यातच ऑटो एक्सपोमध्ये देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनेही आपल्या इलेक्ट्रिक कार कॉन्सेप्ट Maruti eVX वरून पडदा उचलला आहे. आता वृत्त येत आहे, की कंपनीच्या फ्यूचर प्लॅनमध्ये 6 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे जी FY2030 पर्यंत बाजारात येऊ शकतात.
माध्यमांतील वृत्तांनुसार, मारुती सुझुकीची पॅरेंट कंपनी सुझुकी मोटर कॉरपोरेशनने (SMC) भारतीय बाजारात आपले प्रोडक्ट प्लॅन सादर केले आहेत. सुझुकी केवळ इलेक्ट्रिकच नाही, तर कार्बन न्यूट्रल ICE इंजिन असलेली वाहनेही बाजारात आणण्याच्या विचारात आहे. जी वाहने सीएनजी, बायोगॅस आणि इथेनॉल मिश्रित फ्यूअलवर चालतील. एवढेच नाही, तर ब्रँडकडून बाजारात सर्वप्रथम इलेक्ट्रिक वाहन म्हणून Maruti eVX सादर केली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
गायीच्या शेणापासून मिळणाऱ्या बायोगॅसवर धावणार कार! -
कंपनी बायोगॅस व्यवसायावरही लक्ष केंद्रित करेल. यात गुरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचे उत्पादन आणि पुरवठा केला जाईल. या बायोगॅसचा वापर सुझुकीच्या CNG मॉडेलसाठी केला जाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, एका दिवसातील 10 गायींच्या शेणापासून तयार होणारा बायोगॅस एका कारच्या रोजच्या ड्राइव्हसाठी पुरेसा असेल, असेही या वृत्तांत म्हणण्यात आले आहे.
सध्या कंपनी आपला सीएनजी पोर्टफोलिओ वाढविण्यावर अधिक भर देत आहे. मारुती सुझुकीने नुकतेच आपले स्विफ्ट, एक्सएल 6 आणि बलेनो सारखे मॉडेल्स सीएनजी व्हेरिअँटमध्ये सादर केले आहेत.