आता वाहतूक पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही....कसे ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 09:02 AM2018-08-10T09:02:30+5:302018-08-10T09:03:52+5:30
परिवाहन मंत्रालयाने यासंबंधीचा अध्यादेश काढला असून यामध्ये डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल केल्याने आता यापुढे वाहतूक पोलिसांना तुमचे लायसन्स आणि गाडीची कागदपत्रे पडताळणीसाठी मागता येणार नाहीत. परिवाहन मंत्रालयाने यासंबंधीचा अध्यादेश काढला असून यामध्ये डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत.
बऱ्याचदा बाहेर जाताना वाहनाची कागदपत्रे, लायसन्स, पीयुसी, इंन्शुरन्स सोबत ठेवणे शक्य होत नव्हते. यामुळे वाहतूक पोलिसांनी अडविल्यास नाहक भुर्दंड भरावा लागत होता. आता या कटकटीपासून मुक्तता होणार आहे. वाहनाच्या नंबरवरून पोलीस त्यांच्या मोबाईलवरील अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा पोलीस आणि वाहन चालक या दोघांनाही होणार आहे.
आधी वाहनाची कागदपत्रे गहाळ झाल्यास त्याची तक्रार आरटीओकडे करूनही ही कागदपत्रे पुन्हा मिळत नव्हती. सारथी या अॅपमुळे ती पुन्हा मिळण्याची शक्यता वाढली आहे. सध्या डिजिलॉकर हे अॅपच अँड्रॉइड व आयओएसवर उपलब्ध आहे. मात्र, एम- परिवाहन हे अॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध असून येत्या 10 दिवसांत ते आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे परिवाहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि मोटार वाहन कायदा 1988 मध्ये हे बदल करण्यात आले आहेत. डिजिटल डॉक्युमेंट वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वीकारली जात नसल्याच्या बऱ्याच तक्रारी परिवाहन मंत्रालयाकडे माहिती अधिकारामार्फत करण्यात आल्या होत्या.