आता २० किमीपर्यंत टोल माफ, नवा नियम; टोल नाक्यावरही पैसे कापणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 15:17 IST2024-09-11T15:16:28+5:302024-09-11T15:17:29+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही वर्षांपासून टोलनाक्यावर टोल नाही तर जेवढे अंतर कापाल तेवढ्याचाच टोल आपोआप कापणार असल्याचे ...

आता २० किमीपर्यंत टोल माफ, नवा नियम; टोल नाक्यावरही पैसे कापणार नाहीत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही वर्षांपासून टोलनाक्यावर टोल नाही तर जेवढे अंतर कापाल तेवढ्याचाच टोल आपोआप कापणार असल्याचे सांगत होते. ही यंत्रणा आता प्रत्यक्षात येऊ लागली आहे. टोलच्या रस्त्यांवर जीएनएसएस ही सॅटेलाईट यंत्रणा लागू करण्यात आली आहे. ज्या गाड्यांमध्ये जीएनएसएस असेल त्यांचा टोल या पद्धतीने कापला जाणार आहे.
टोल नाक्यावर १०० मीटरपेक्षा मोठी रांग, १० सेकंड वेटिंगचा खरोखरच नियम होता? NHAI कडे लाखो तक्रारी...
यानुसार ज्या गाड्या या तंत्रज्ञानाने लेस असतील त्यांना टोल असलेले राज्य महामार्ग आणि एक्स्प्रेस वे वरून दररोज जरी २० किमी एवढाच प्रवास केला तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
यासाठी २००८ च्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या नव्या नियमांनुसार टोल असलेल्या रस्त्यावरून २० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यानंतर जर पुढे प्रवास केला तरच एकूण अंतराचा टोल आकारला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे जीएनएसएस असलेल्या वाहनांसाठी वेगळी लेन असणार आहे. या वाहनांना न थांबता टोल नाका पास करता येणार आहे. या वाहनांच्या लेनमध्ये फास्टॅगवाले वाहन घुसल्यास त्याच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे.
ही यंत्रणा वापरण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाईस वाहनात असणार आहे. तसेच टोल रोडवर नंबर प्लेट वाचू शकणारे कॅमेरे असणार आहेत. यानुसार वाहनाने कापलेले अंतर ओळखून टोल घेतला जाणार आहे. यामुळे इंधन वाचणार असून टोलनाक्यावरील वेळही वाचणार आहे. ही प्रणाली सध्या कर्नाटकातील NH-275 च्या बेंगळुरू-म्हैसूर विभाग आणि हरियाणातील NH-709 च्या पानिपत-हिसार विभागावर बसविण्यात आली असून प्रायोगिक तत्वावरील अभ्यास पूर्ण झाल्यानंतर देशभरात बसविली जाणार आहे.