Odysse Vader : भारतात लॉन्च झाली स्वस्त इलेक्ट्रिक बाईक, 125Km ची रेंज; फक्त 999 रुपयांत करा बुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 08:49 PM2023-03-31T20:49:50+5:302023-03-31T20:50:59+5:30
भारतातील इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये एका नवीन प्लेअरने एंट्री घेतली आहे.
Odysse Vader : इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये आणखी एका नवीन प्लेअरने एंट्री घेतली आहे. आघाडीचे इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप Odysse Electric ने आज आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक Odysse Vader बाजारात आणली आहे. आकर्षक लूक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकने सुसज्ज असलेली ही देशातील पहिली बाईक आहे, ज्यामध्ये 7-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. याचा वापर Android डिस्प्ले आणि Google Map नेव्हिगेशनसाठी केला जाईल. कंपनीने ही बाईक फक्त 1,09,999 रुपये (एक्स-शोरुम, अहमदाबाद) च्या किमतीत लॉन्च केली आहे.
फक्त किंमतच नाही तर Odysse Vader अनेक प्रकारे खास आहे. ही इलेक्ट्रिक बाइक दैनंदिन वापरासाठी अतिशय योग्य सिद्ध होईल. कंपनीने यामध्ये 18 लिटर क्षमतेचे स्टोरेज स्पेसही दिले आहे. याशिवाय ही बाईक वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात मिडनाईट ब्लू, फेयरी रेड, ग्लॉसी ब्लॅक, व्हेनम ग्रीन आणि मिस्टी ग्रे यांचा समावेश आहे.
बॅटरी पॅक आणि परफॉर्मन्स:
कंपनीने या बाईकमध्ये 3.7 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी 3 kW क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरला जोडलेली आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 6 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक एका चार्जमध्ये 125 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते आणि याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 4 तास लागतात. या बाईकचा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास आहे.
फक्त 999 रुपयांत बुक करा:
नवीन Odysse Vader लॉन्च करण्यासोबतच कंपनीने अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. इच्छुक ग्राहक ही बाईक कंपनीच्या अधिकृत डीलरशिपद्वारे फक्त रु.999 मध्ये बुक करू शकतात. येत्या जुलै महिन्यापासून या बाईकची डिलिव्हरी सुरू होणार असून, या बाईकचे ग्राहक फेम-2 सबसिडीचा लाभ घेऊ शकतात.