Electric Scooters मध्ये आग: 'या' कंपनीनं घेतला मोठा निर्णय; परत मागवल्या हजारो गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 10:33 PM2022-04-16T22:33:01+5:302022-04-16T22:33:31+5:30
कंपनीनं आपल्या गाड्यांच्या हेल्थ चेकअप कॅम्पेनअंतर्गत हा निर्णय घेतला असून बॅटरीत कोणत्याही प्रकारचा दोष आढळला तर ते त्वरित ठीक करण्यात येणार असल्याचंही सांगितलं.
देशात इलेक्ट्रीक स्कूटरला (Electric Scooter) आग लागण्याच्या घटनांदरम्यान लोकप्रिय इलेक्ट्रीक दुचाकी कंपन्यांपैकी एक असलेल्या ओकिनावा ऑटोटेकने (Okinawa Autotech) मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रेझ प्रो (Praise Pro) स्कूटरचे ३२१५ युनिट्स परत मागवले आहेत. स्कूटरच्या बॅटरीमध्ये काही दोष असल्यास कंपनी ताबडतोब दुरुस्त करेल, असे ओकिनावाने म्हटले आहे. हा ओकिनावाच्या हेल्थ चेकअप शिबिरांचा एक भाग आहे.
"बॅटरीत कोणत्याही प्रकारचं सैल कनेक्शन किंवा कोणत्याही नुकसानीटी तपासणी केली जाईल आणि ओकिनावा अधिकृत डीलरशीपमध्ये ही मोफत दुरुस्त केली जाईल," असं कंपनीनं एका निवेदनाद्वारे म्हटलंय. दुरूस्तीदरम्यान कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यासाठी इलेक्ट्रीक टू व्हीलर उत्पादक ओकिनावा डीलर भागीदारांसोबत काम करत आहे. यासाठी, कंपनी स्वतः ग्राहकांशी संपर्क साधत आहे. कंपनीचे देशभरात सुमारे ५०० डीलर्सचे नेटवर्क आहे.
आगीच्या घटना
गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रीक दुचाकींमध्ये आगीच्या घटना समोर येत आहेत. अलीकडे जितेंद्र इलेक्ट्रीकच्या सुमारे ४० इलेक्ट्रीक वाहनांना (EVs) आग लागली. कारखान्यातून कंटेनरमध्ये ई-स्कूटर नेत असताना हा अपघात घडला होता. यापूर्वीही ओला आणि प्योअर ईव्हीच्या स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. २८ मार्च रोजी पुण्यात Ola S1 इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागली होती. व्हिडीओमध्ये, मिडनाईट ब्लू कलर Ola S1 Pro ला आग लागल्याचं दिसत होतं. त्याचवेळी चेन्नईमध्ये प्योअर ईव्ही स्कूटरला आग लागल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.