बाता लाखाच्या! ओलाने फसवले? डिसेंबरमध्ये विकल्या फक्त 'एवढ्या' स्कूटर, FADAने गुपित फोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 03:21 PM2022-01-05T15:21:23+5:302022-01-05T15:21:41+5:30
Ola Electric Scooter : सध्या अनेक जण पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर अन्य पर्यायांचा वापर करण्यावर भर देत आहेत. ओलाच्या गाडीची अनेकांमध्ये होती क्रेझ.
ओला इलेक्ट्रीकनं (Ola Electric) 30 डिसेंबर 2021 पर्यंत फक्त 111 Ola S1 आणि Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर वितरित केल्या आहेत. केंद्राच्या वाहन पोर्टलनुसार, ओला इलेक्ट्रीकने फक्त चार राज्यांमध्ये त्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटर वितरित केल्या असल्याची माहिती समोर आलीये. ओला इलेक्ट्रीकने अद्याप त्याच्या वितरणाबाबत कोणताही डेटा जारी केलेला नाही.
ओला इलेक्ट्रीकने त्यांच्या बहुतांश S1 आणि S1 Pro इलेक्ट्रीक स्कूटर्स कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये वितरित केल्या. वितरित केलेल्या 111 इलेक्ट्रीक स्कूटरपैकी 60 कर्नाटकात आणि 25 तामिळनाडूमध्ये होत्या. महाराष्ट्र आणि राजस्थान ही इतर दोन राज्ये आहेत जिथे गेल्या महिन्यात ओला इलेक्ट्रीक स्कूटरच्या अनुक्रमे 15 आणि 11 युनिट्सची नोंदणी झाली होती, अशी माहिती डेटावरून समोर आली.
ओला इलेक्ट्रीकने दावा केला होता की त्यांना त्यांच्या ई-स्कूटरसाठी सुमारे 90,000 बुकिंग्स मिळाले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ओलाने आपली ई-स्कूटर लॉन्च केली होती. तसंच 15 डिसेंबरपासून यांची डिलिव्हरी सुरू करण्यात आली.
"10 दशलक्ष (एक कोटी) क्षमतेच्या दाव्यासह, ओला इलेक्ट्रीकने डिसेंबर महिन्यात केवळ 111 वाहनांची विक्री केली. डायरेक्ट टू कस्टमर हे कॉन्सेप्ट ही यातील मोठी बाधा बनत आहे का? हे खरं आहे का की इतर काही माध्यम/स्टार्टअप कंपनीची जाहिरात?," असं ट्वीट फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (FADA) अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी केले आहे.
With a claim of 10Mn capacity, @OlaElectric sells mere 111 vehicles in Dec.
— Vinkesh Gulati (@VinkeshGulati) December 31, 2021
Is Direct to Customer concept posing a big hindrance?
Is it for real or just another media/startup hype company? pic.twitter.com/Y2e0O9QyiN
सर्व युनिट्स पाठवल्याचा दावा
कंपनीने S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रीक स्कूटरच्या पहिल्या बॅचची सर्व युनिट्स पाठवली असल्याची माहिती गेल्या आठवड्यात शुक्रवारी ओला इलेक्ट्रीकचे सीईओ आणि सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी सांगितले होते. "काही ट्रान्झिटमध्ये आहेत, बहुतेक आधीच तुमच्या जवळच्या वितरण केंद्रांवर आहेत आणि आरटीओ नोंदणी प्रक्रियेतून जात आहेत. नोंदणी प्रक्रियेला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला कारण पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया सर्वांसाठी नवीन आहे." अग्रवाल यांनी 'भविष्यात नोंदणी जलद होईल', असे आश्वासनही दिले होते.
इलेक्ट्रीक स्कूटरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी ओला इलेक्ट्रीकला जवळपास चार महिने वाट पाहावी लागली. बहुप्रतिक्षित मॉडेल लाँच झाल्यानंतर जवळपास चार महिने उशीर झाल्यामुळे पुरवठ्याच्या समस्या आल्या. यामुळे अलिकडच्या काळात प्रत्येक वाहन उत्पादकाला समस्यांचा सामना करावा लागत आहे.