ओला ईलेक्ट्रीकने एस१ प्रो स्कूटरचे उत्पादन रोखले; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 03:12 PM2022-07-29T15:12:58+5:302022-07-29T15:13:10+5:30
ओला ईलेक्ट्रीकने कृष्णागिरी, तामिलनाडु प्लांटमध्ये एका आठवड्यासाठी इलेक्ट्रीक स्कूटरचे उत्पादन रोखले आहे.
ओला ईलेक्ट्रीक कंपनी गेल्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात आहे. हायफाय स्कूटर लाँच केली, तरी तिच्यात एवढे दोष होते की ग्राहक वैतागले होते. हळूहळू ओला ईलेक्ट्रीक स्कूटर एस१ प्रोची मागणीही कमी होऊ लागली होती. त्यातच आता ओलाने एस१ प्रो स्कूटरचे उत्पादन आठवड्यासाठी रोखले आहे.
ओला ईलेक्ट्रीकने कृष्णागिरी, तामिलनाडु प्लांटमध्ये एका आठवड्यासाठी इलेक्ट्रीक स्कूटरचे उत्पादन रोखले आहे. वार्षिक मेन्टेनन्स आणि अन्य मशीनरी बसविण्यासाठी हा प्लांट आठवड्याभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत माहिती असलेल्या ओलाच्या तीन सुत्रांनी ही माहिती दिली आहे. जागरणने याचे वृत्त दिले आहे.
उत्पादन ठप्प होण्यामागे इन्व्हेंटरीचा ढीग हे सर्वात मोठे कारण आहे. ओला कंपनीत सध्या ४००० स्कूटरचे उत्पादन सुरु आहे. कंपनीकडे सध्या अनेक हजार युनिट्स उपलब्ध आहेत जी कंपनीने ग्राहकांच्या प्री-ऑर्डर घेतल्या होत्या त्यांना पाठवण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ओलाने ट्रायल उत्पादन सुरु केले होते. डिसेंबरपासून दररोज उत्पादन सुरु केले होते. यानंतर लोकांना दोन-तीन महिन्यांच्या विलंबाने स्कूटर मिळाल्या. मात्र, त्यामध्ये जवळपास २५ हून अधिक समस्या होत्या. काहींनी तर स्कूटरला वैतागून तिला आग देखील लावली. अनेकांच्या स्कूटरचे पुढचे चाक रॉडसह तुटून पडत होते. अनेकांना बॅटरीची समस्या येत होती. काही दिवस स्कूटर सुरु केली नाही की बॅटरी ड्रेन होत होती असे एका मागोमाग एक समस्या येत होत्या. या स्कूटरला आग लागल्याने विचारात असलेल्या लोकांनी पाठ फिरवली होती. या साऱ्याचा परिणाम कंपनीच्या स्कूटरच्या विक्रीवर झाल्याचे गेल्या महिन्यात दिसून आले आहे.