Ola Electric: ओलाला 2022-23 मध्ये तब्बल 1100 कोटींचे नुकसान; कंपनीचा अंदाज चुकला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 06:09 PM2023-07-30T18:09:22+5:302023-07-30T18:09:34+5:30
ओला इलेक्ट्रिकला सॉफ्टबँकेचे समर्थन आहे. ही कंपनी $700 दशलक्ष पर्यंतचा IPO आणण्याच्या तयारीत आहे.
भारताची सर्वात मोठी इलेक्ट्रीक स्कूटर निर्माता कंपनी ओला ईलेक्ट्रीक संकटात सापडली आहे. मोठ्या तामझामात स्कूटर लाँच केली, जगातील सर्वात मोठा ईलेक्ट्रीक स्कूटरचा प्लांट उभा केल्याचा कंपनीने दावा केला होता. परंतू, अवघ्या दीड वर्षातच कंपनीला मोठे नुकसान झाले आहे.
मार्चमध्ये संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात $335 दशलक्षच्या महसुलावर $136 दशलक्षचा ऑपरेटिंग तोटा कंपनीने नोंदवला आहे. घोषित महसूल लक्ष्य कंपनीला गाठता आलेले नाही. तीन सुत्रांनी रॉयटर्सला ही माहिती दिली आहे.
ओला इलेक्ट्रिकला सॉफ्टबँकेचे समर्थन आहे. ही कंपनी $700 दशलक्ष पर्यंतचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. या कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांकडे नुकसानीची माहिती दिलेली नाहीय. मागील वर्षाची कमाई फाइल करण्यासाठी सप्टेंबरपर्यंत ही माहिती द्यावी लागते. यावर ओलाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे, असा दावा रॉयटर्सच्या वृत्तात करण्यात आला आहे.
रन रेट हा एक आर्थिक निर्देशक आहे ज्याची गणना कंपनीच्या एका महिन्याची कमाई ही 12 पटीने दाखविली जाते. गेल्या वर्षी जूनमध्ये ओलाने वर्षाच्या अखेरीस १अब्ज डॉलरचे रनरेट पार करणार असल्याचे म्हटले होते. परंतु 2022/23 साठी महसूल अंदाज चुकला आणि जवळपास ११०० कोटी रुपयांचा तोटा कंपनीला झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
2021 च्या उत्तरार्धात विक्री झाल्यापासून ओलाने 32 टक्के ईलेक्ट्रीक स्कूटरचे मार्केट व्य़ापले आहे. 2019 पासून गुंतवणूकदारांकडून सुमारे $800 दशलक्ष उभे केले आहेत. गेल्या वर्षी कंपनीने बाजारमुल्य हे $5 अब्ज एवढे होते. 2023-24 मध्ये महसूल चौपट होऊन 1.5 अब्ज डॉलर्सवर जाईल असा अंदाज ओलाने लावला होता. या वर्षात ओला पहिला नफा कमावेल असा अंदाज कंपनीचा आहे. परंतु भारताने मे महिन्यात ई-स्कूटर्सवरील सरकारी प्रोत्साहने कमी करण्याआधीचा हा अंदाज होता. यामुळे आता पुन्हा एकदा हा अंदाज चुकण्याची शक्यता आहे.