OLA Electric Bike: ओलाची इलेक्ट्रीक बाईकही येणार; स्वस्त स्कूटरवरही काम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 08:34 IST2021-11-15T08:34:08+5:302021-11-15T08:34:49+5:30
OLA Electric Scooter, Bike: Ola S1 आणि S1 Pro या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आल्या आहेत. या स्कूटरची टेस्ट राईड देखील सुरु झाली आहे. काही दिवसांतच ओलाच्या स्कूटर रस्त्यांवर धावताना दिसतील.

OLA Electric Bike: ओलाची इलेक्ट्रीक बाईकही येणार; स्वस्त स्कूटरवरही काम सुरु
ओला इलेक्ट्रीक स्कूटरच्या भव्य यशानंतर ओला आता बाईकवर काम करत आहे. यामुळे बाईक प्रेमींसाठी मोठी दिलासा देणारी बाब आहे. ओला इलेक्ट्रीकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी पुढील वर्षी बाईक येणार असल्याचे कन्फर्म केले आहे. स्कूटरनंतर कार येणार असल्याचे अग्रवाल म्हणाले होते. परंतू त्याला आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता आहे. तोवर बाईक आणि कमी किंमतीतील आणखी एक स्कूटर बाजारात आणण्याची ओलाची योजना आहे.
एका इलेक्ट्रीकवरील ब्लॉगवर अग्रवाल यांनी ट्विटकरून हो, पुढील वर्षी असे म्हटले आहे. कंपनीने अलीकडेच S1 आणि S1 Pro इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणली आहे. या स्कूटरच्या टेस्ट राईडला देखील चांगली मागणी आहे. गेल्या महिन्यात, ओलाने सांगितले होते की त्यांनी केवळ दोन दिवसांत 1,100 कोटी रुपयांची इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री पूर्ण केली आहे.
Yes next year👍🏼 https://t.co/dLT1n5qdRp
— Bhavish Aggarwal (@bhash) November 13, 2021
Ola S1 आणि S1 Pro या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आल्या आहेत. बाजारातील मागणी पाहता, कंपनीने वार्षिक उत्पादन क्षमता 10 लाखांवरून 20 लाख युनिट्सपर्यंत वाढवेल असे म्हटले आहे. ओलाने दावा केला आहे की उत्पादन जोरात सुरू असताना, जगभरात उत्पादित एकूण इलेक्ट्रिक स्कूटरपैकी 15% स्कूटर या प्लांटमध्ये तयार केले जातील.
ज्या ग्राहकांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर बुक केली आहेत त्यांनी तक्रार केली आहे की त्यांना टेस्ट राइड्सबद्दल स्पष्ट माहिती मिळत नाही. याशिवाय, त्यांना डिलिव्हरी आणि पेमेंटचे कोणतेही पुष्टीकरण मिळालेले नाही. ओलाच्या स्कूटरची डिलिव्हरी 18 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार होती. परंतू, टेस्ट राईडनंतरच पेमेंट प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतरच स्कूटर बुक करणाऱ्या ग्राहकांना डिलिव्हरी दिली जाईल, असा निर्णय ओलाने घेतला होता.