Ola electric scooter चे तुफान बुकिंग; जगात बनविला रेकॉर्ड, जाणून घ्या 24 तासांत काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 06:54 PM2021-07-17T18:54:36+5:302021-07-17T18:56:39+5:30
Ola e-scooter booking: अद्याप कंपनीने स्कूटरबाबत कोणत्याही स्पेसिफिकेशंसची घोषणा केली नाही. परंतु ज्यापद्धतीने कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलंय की, ही फक्त सुरुवात आहे.
ओला इलेक्ट्रीकचे (Ola electric ) सीईओ भाविश अग्रवाल यांनी शनिवारी ओला इलेक्ट्रीक स्कुटरच्या (Ola e-scooter booking) बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. Ola e-scooter ला 24 तासांत 1 लाखांहून अधिक बुकिंग मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. याचबरोबर ही स्कूटर जगातील सर्वाधिक आगाऊ बुकिंग मिळविलेली स्कूटर बनल्याचे ते म्हणाले. (Ola e-scooter has garnered 1 lakh bookings in just 24 hours of opening of pre-launch bookings)
ओला ईलेक्ट्रीकने 15 जुलै रोजी 499 रुपयांत स्कूटर बुक करण्याची घोषणा केली होती. याद्वारे कंपनी बुकिंग केलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने स्कूटरची अपडेट देत राहणार आहे. अद्याप कंपनीने स्कूटची किंमत जाहीर केलेली नाहीय.
भारतातील ईव्ही क्रांतीची ओलाने स्फोटक सुरुवात केली आहे. जवळपास 1 लाखांहून अधिक लोकांनी याचे आगाऊ बुकिंग केले आहे, असे अग्रवाल यांनी ट्विट केले आहे. आमच्या पहिल्याच ईव्ही वाहनाला मोठा प्रतिसाद दिल्याने उत्सुकता वाढली आहे. ग्राहक आता पर्यायी इंधनाकडे वळत आहेत, याची ही नांदी आहे, असे ते म्हणाले.
ओलाच्या या स्कूटरची विक्री या महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टपासून होण्याची शक्यता आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरचं बुकींग किंमत फक्त ४९९ इतकी ठेवली आहे. ही रक्कम पूर्णपणे रिफंडेबल असणार आहे असं ओलानं जाहीर केले आहे. म्हणजे ग्राहक जर बुकींग कॅन्सल करतील तर त्याला पूर्ण पैसे परत केले जातील. ओला इलेक्ट्रीक वेबसाईटवर जाऊन त्याची बुकींग करू शकतात. त्यासाठी इच्छुक खरेदीदारांना वेबसाईटवर पहिल्यांदा स्वत:चं अकाऊंट बनवावं लागेल त्यानंतर स्कूटर बुकींग करू शकता. पहिल्यांदा बुकींग करणाऱ्या ग्राहकांना डिलिवरीसाठी प्राधान्य दिलं जाईल असं OLA नं म्हटलं आहे.
अद्याप कंपनीने स्कूटरबाबत कोणत्याही स्पेसिफिकेशंसची घोषणा केली नाही. परंतु ज्यापद्धतीने कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलंय की, ही फक्त सुरुवात आहे. स्कूटरची ड्रायव्हिंग रेंज, चार्जिंग टाइमसह स्कूटर डिलिवरी टाइमलाइन आणि स्पेसिफिकेशंस याबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाणार आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ यांनी इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ओला इलेक्ट्रिक लवकरच भारतात त्यांची पहिली स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. भारतीय दुचाकी बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत स्कूटरच्या किंमतीची घोषणा करण्यात येईल. ही एथर एनर्जी Ather 450x सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरला टक्कर देईल.