ओला देशातील 400 शहरांमध्ये 4 हजारांहून अधिक चार्जिंग स्टेशन उभारणार, ग्राहकांना ई-स्कूटर मोफत चार्ज करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 01:12 PM2021-12-29T13:12:00+5:302021-12-29T13:13:28+5:30
Ola Electric : ओला इलेक्ट्रिकचे हायपरचार्जर केवळ 18 मिनिटांत ई-स्कूटरची बॅटरी 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यास सक्षम असेल.
नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिक देशभरात 'हायपरचार्जर' (Hyperchargers) नावाने चार्जिंग नेटवर्क उभारणार आहे. या 'हायपरचार्जर'च्या मदतीने ओला ई-स्कूटर 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते. ग्राहकांना 6 महिन्यांसाठी याचा मोफत लाभ घेता येणार आहे. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, कंपनी आगामी काळात चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार करणार आहे. ओलाने यावर्षी आपली इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो लाँच केली. कंपनीने अलीकडेच देशातील काही शहरांमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू केली आहे.
तसेच, ओला इलेक्ट्रिकचे भारतात 4,000 हून अधिक चार्जिंग पॉइंट्स इंस्टॉल करण्याचे उद्दिष्ट आहे. हायपरचार्जर पहिल्यांदा बीपीसीएल पेट्रोल पंपासारख्या सार्वजनिक ठिकाणी बसवले जात आहेत. त्यासोबतच निवासी संकुलात बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.
जूनपर्यंत मोफत चार्जिंग
सर्व शहरांमध्ये हायपरचार्जर रोल आउट सुरू झाले आहे. दीड महिन्यात देशभरात 4000 हून अधिक हायपरचार्जर बसवले जातील. ओलाचे सर्व ग्राहक जूनपर्यंत मोफत याचा लाभ घेऊ शकतील, असे भाविश अग्रवाल म्हणाले. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये ओला इलेक्ट्रिकने पहिले हायपरचार्जर लाँच करण्याची घोषणा केली होती. कंपनीने सांगितले होते की, 'हायपरचार्जर' सेटअप अंतर्गत आपल्या ग्राहकांसाठी चार्जिंग सपोर्ट इंस्टॉल केले जाईल, जे देशातील 400 शहरांमधील 100,000 हून अधिक ठिकाणी/टचपॉइंट्सवर असेल.
8 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल स्कूटर
ओला इलेक्ट्रिकचे हायपरचार्जर केवळ 18 मिनिटांत ई-स्कूटरची बॅटरी 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यास सक्षम असेल. यासह, स्कूटर एका चार्जवर 75 किमीचा अर्धा पल्ला कव्हर करू शकेल. मात्र, ओला प्रत्येक स्कूटरसोबत होम-चार्जर देखील देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांची स्कूटर घरबसल्याही चार्ज करता येईल. कंपनीने आपल्या वेबसाइटवर शहरनिहाय चार्जिंग नेटवर्क नमूद केले आहे आणि अनेक ठिकाणी लोकेशनही सांगितले आहे. बहुतेक चार्जिंग स्टेशन टियर 1- आणि टियर 2 मध्ये आहेत.