ओला इलेक्ट्रिक ३२०० नवीन स्टोअर्स उघडणार, देशभरातील सर्व्हिस नेटवर्क मजबूत करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 04:31 PM2024-12-02T16:31:52+5:302024-12-02T16:36:06+5:30
Ola Electric : ओला इलेक्ट्रिक कंपनीने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, कंपनी २० डिसेंबर २०२४ पर्यंत आपल्या स्टोअर्सची संख्या ४००० पर्यंत वाढवणार आहे.
Ola Electric : सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. त्यामुळे ओला इलेक्ट्रिक ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या योजनेवर काम करत आहे. देशभरात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची पोहोच वाढवण्यासाठी कंपनी आपल्या मालकीच्या स्टोअर्सची संख्या ४००० पर्यंत वाढवणार आहे.
ओला इलेक्ट्रिक कंपनीने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, कंपनी २० डिसेंबर २०२४ पर्यंत आपल्या स्टोअर्सची संख्या ४००० पर्यंत वाढवणार आहे. सध्या ओलाचे देशभरात ८०० स्टोअर्स आहेत. म्हणजेच कंपनी अवघ्या २० दिवसांत ३२०० नवीन स्टोअर्स उघडणार आहे. या नवीन स्टोअर्समध्ये ग्राहकांना सर्व्हिस सुविधा मिळतील, ज्यामुळे कंपनीचे देशभरातील सर्व्हिस नेटवर्क मजबूत होईल.
ओला इलेक्ट्रिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अग्रवाल म्हणाले, "आमच्या विस्तृत 'डायरेक्ट-टू-कंझ्युमर' (D2C) नेटवर्क आणि आमच्या नेटवर्क पार्टनर प्रोग्राम अंतर्गत 'टचपॉइंट्स' सह, आम्ही मोठ्या आणि मध्यम शहरांद्वारे देशभरात पोहोचू शकतो." दरम्यान,'नेटवर्क पार्टनर प्रोग्राम' अंतर्गत २०२५ च्या अखेरपर्यंत सेल्स आणि सर्व्हिसमध्ये दहा हजार पार्टनर्सचा समावेश करण्याची कंपनीची योजना आहे.
ओला स्कूटरची विक्री ३० टक्क्यांनी घसरली
ओला इलेक्ट्रिकसाठी हे चढ-उतार नवीन नाहीत. अलीकडच्या काळात, कंपनीने तिच्या विक्रीत सातत्यपूर्ण बदल पाहिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ओला स्कूटरची विक्री मोठ्या आकड्याने घसरली आहे. उत्सव काळात सुरु केलेली बॉस ऑफर आजही कंपनीने सुरुच ठेवली आहे. तरीही नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या विक्रीत ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ४०००० हून अधिक स्कूटर कंपनीने विकल्या होत्या. नोव्हेंबरला ही विक्री २७७४६ वर आली आहे.