ओलाने फेब्रुवारीत असा आकडा फुगविला; रोडस्टर अद्याप रस्त्यावर आली नाही ती विकल्याचे दाखविले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 14:14 IST2025-04-08T14:13:54+5:302025-04-08T14:14:22+5:30
Ola Electric Sales: ओलाने फेब्रुवारी महिन्यात 25,207 गाड्या विकल्याचा आकडा जाहीर केला होता. धक्कादायक बाब म्हणजे यात निम्म्या गाड्या या अद्याप लाँच न झालेल्या आहेत.

ओलाने फेब्रुवारीत असा आकडा फुगविला; रोडस्टर अद्याप रस्त्यावर आली नाही ती विकल्याचे दाखविले...
ओला ईलेक्ट्रीकने फेब्रुवारी महिन्यात विक्री केलेल्या वाहनांच्या आकड्यात मोठी तफावत आढळली होती. शेअर बाजाराला दिलेला आकडा आणि परिवाहन मंत्रालयाकडे विक्रीची नोंदणी झालेला आकडा यात जमीन आस्मानाचा फरक होता. यावरून मंत्रालयाने ओलाला नोटीस पाठवत खुलासा मागविला होता. आता ओलाचा खुलासा आला आहे.
ओलाने फेब्रुवारी महिन्यात 25,207 गाड्या विकल्याचा आकडा जाहीर केला होता. धक्कादायक बाब म्हणजे यात निम्म्या गाड्या या अद्याप लाँच न झालेल्या आहेत. यामुळे ओलाच्या या बनवाबनवीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लाँच न झालेल्या गाड्या यात कशा काय दाखविण्यात आल्या असा सवाल आता उपस्थित होत आहे.
ओलाने फेब्रुवारीमध्ये 15,533 युनिट्सचे उत्पादव केले होते. यात 3,715 स्कूटर या ओलाच्या तिसऱ्या पिढीतील होत्या. तर वाहन पोर्टलवर ओलाच्या 8,647 वाहने रजिस्टर झाल्याचा आकडा होता. आकड्यातील या तफावतीवरून ओलाला मॉर्थने तीन नोटीस पाठविल्या आहेत. तसेच अवजड उद्योग मंत्रालयाने (एमएचआय) ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) कडून या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे.
ओलाने या उत्तरात आपण बुकिंग पूर्ण झालेल्या म्हणजेच ग्राहकांनी पैसे भरलेल्या गाड्यांचा आकडा दाखविल्याचे म्हटले आहे. आमची फेब्रुवारी २०२५ ची विक्री घोषणा प्राथमिक बुकिंगवर नाही तर पूर्ण पैसे भरून आणि पुष्टी केलेल्या ऑर्डरवर आधारित होती. आम्ही या सशुल्क ऑर्डरवर आधारित आमचा विक्री डेटा जाहीर केला. इन-हाऊस प्रक्रियेमुळे वाहन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया विस्कळीत झाली होती, यामुळे या गाड्या बुक होऊ शकल्या नाहीत, असे ओलाने म्हटले आहे.
तसेच आमच्या नवीन उत्पादनांचा म्हणजेच जेन ३ ओला स्कूटर आणि रोडस्टर एक्ससाठी ग्राहकांनी पूर्ण पैसे दिलेल्या ऑर्डरचा यात समावेश आहे, असे ओलाने म्हटले आहे. या आकडेवारीनुसार जेन तीनच्या 10,866 स्कूटरचा समावेश आहे, ज्यांची डिलिव्हरी मार्चमध्ये करण्यात येणार होती. तसेच १,३९५ युनिट्स रोडस्टर एक्स देखील यात दाखविण्यात आल्या आहेत. परंतू, खरे पाहिले तर रोडस्टर अद्याप रस्त्यावर आलेली नाही. म्हणजे विक्रीच झालेली नाही. तरीही ओलाने त्याची विक्री झाल्याचे फेब्रुवारीत दाखविले होते. म्हणजेच २५००० विक्रीच्या आकड्यात ज्या गाड्या उत्पादितच झाल्या नाहीत किंवा विक्री झाली नाही अशा निम्म्या गाड्या आहेत.