Ola Scooter मिळतेय मोफत, फक्त करावे लागेल 'हे' काम; Bhavish Aggarwal यांचे ट्विट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 03:13 PM2022-05-21T15:13:52+5:302022-05-21T15:14:33+5:30
Ola Scooter : ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric) प्रमुख भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी एक खास ऑफर आणली आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. यातच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या कंपनी विविध ऑफर आणत आहेत. अशातच ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric) प्रमुख भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी एक खास ऑफर आणली आहे. याअतंर्गत तुम्हालाही ओला इलेक्ट्रिक स्कूटर मोफत (Free Ola Scooter) हवी आहे का? मग, तुम्हाला यासाठी एक काम करावे लागणार आहे.
भाविश अग्रवाल यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांची कंपनी 10 ग्राहकांना मोफत ओला स्कूटर देईल, जे एका चार्जमध्ये 200 किमीची रेंज पूर्ण करतील. कंपनीला असे दोन रायडर्स मिळाले आहेत. यापैकी एका रायडरने MoveOS2 आणि एकाने 1.0.16 वर हा पराक्रम केला आहे, म्हणजेच कोणताही रायडर हा पराक्रम करू शकतो. यासोबत भाविश अग्रवाल म्हणाले की, जो कोणी विजेता होईल, त्यांना जूनमध्ये कंपनीचा Ola Futurefactory म्हटले जाईल आणि तेथे मोफत केशरी ओला स्कूटरची डिलिव्हरी दिली जाईल.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक ग्राहकांनी ओला स्कूटरबाबत सोशल मीडियावर आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. यामध्ये कंपनीच्या स्कूटरच्या रेंज आणि रिव्हर्स फीचरबाबत सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे लक्षात घेऊन कंपनीने नुकतीच आपल्या स्कूटरसाठी MoveOS2 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम लॉन्च केली आहे. याशिवाय पुण्यात ओला स्कूटरला आग लागल्याच्या घटनेमुळेही कंपनीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. या घटनेनंतर कंपनीला 1,411 ओला स्कूटरही परत मागवाव्या लागल्या होत्या.
खरेदीची विंडो पुन्हा सुरू
21 मे पासून ओला स्कूटरच्या खरेदीची विंडो पुन्हा सुरू होत आहे. Ola S1 ची दिल्लीत सध्याची किंमत 85,099 रुपये आहे आणि Ola S1 Pro ची किंमत 1,10,149 रुपये आहे. यामध्ये FAME-II आणि राज्य सरकारच्या अनुदानाचा समावेश आहे. ओला स्कूटरच्या खरेदीची विंडो याआधी 17 आणि 18 मार्च रोजी उघडण्यात आली होती.