ओला पेट्रोल स्कूटरला टफ फाईट देणार! गडकरींनी म्हटल्याप्रमाणे स्वस्तात ईव्ही आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 01:53 PM2023-06-21T13:53:06+5:302023-06-21T15:26:43+5:30
ओला इलेक्ट्रीक नवी स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे.
देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक स्कूटर निर्माता कंपनी पावसाळ्यात पुन्हा एकदा धमाका करणार आहे. पेट्रोल दुचाकी विकणाऱ्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी ओला स्वस्तातली नवीन स्कूटर आणण्याची तयारी करत आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर हेल्मेट घातल्याशिवाय चालू होणार नाही, हे फिचर ओलाच्या सर्वच स्कूटरमध्ये येण्याची शक्यता आहे.
ओला इलेक्ट्रीक नवी स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे. सध्या पेट्रोल स्कूटरच्या किंमती ८० ते एक लाखाच्या आसपास आहेत. तर इलेक्ट्रीक स्कूटर त्यापेक्षा २४ ते ५० हजारांनी महाग आहेत. यामुळे पेट्रोल स्कूटरच्या किंमतीत इलेक्ट्रीक स्कूटर आणली तर ग्राहकांसमोर चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
ओला जुलै महिन्यात ही स्कूटर आणू शकते. भाविश यांनी एंड आइस एज शो पार्ट-1 असे नाव दिले आहे. या स्कूटरमध्ये एलईडी लाइट्स, एलईडी डीआरएल देण्यात येणार आहेत. डिझाईन सारखेच असले तरी नवीन फिचर्स दिले जाऊ शकतात. जुलैतील कार्यक्रमात काही नव्या घोषणाही केल्या जाऊ शकतात.
सध्या ओलाच्या स्कूटरची किंमत १.१० लाख रुपयांपासून सुरु होते, ते १.४० लाख रुपयांपर्यंत जाते. जून २०२३ पासून फेम २ सबसिडी कमी केल्यानंतर इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे विक्रीतही घट झाली आहे.